मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून आता दहा संघ सज्ज आहेत. यंदाच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. बीसीसीआयने यासाठी जोरदार तयारी केली आहे. या स्पर्धेत रॉबिन राउंड पद्धतीने सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामनाही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठी सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वनडे वर्ल्डकप इतिहासात भारताने पाकिस्तान विरुद्धचा एकही सामना गमावलेला नाही. पण आता सामन्याआधीच रुग्णालयात बेडची बुकिंग सुरु झाली आहे. यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्व हॉटेल्स बुक झाले आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमी आता रुग्णालयात बेडची बुकिंग करत असल्याचं समोर आलं आहे. मनी कंट्रोलनं ही बातमी समोर आणली आहे. अहमदाबादमधील एका डॉक्टरने सांगितलं की, लोकं फुल बॉडी चेकअपसह एक रात्र थांबण्याासठी बेड बुक करत आहेत.
अहमदाबादमधील हॉटेलचं एका दिवसाचं भाडं जवळपास 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर रुग्णालयात एका बेडसाठी 3 ते 25 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या तुलनेच ही निम्म्याने कमी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी सामना पाहण्यासोबत फायद्याचा सौदा करत आहेत.
“आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. यामुळे रुग्णांचं हित लक्षात घेऊन आम्ही विचार करत आहे. माझ्याकडे एका युएसएच्या मित्राने रुग्णालाच थांबण्यासाठी चौकशी केली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना त्याला पाहायचा आहे. तो रुग्णालयातील मेडिकल फॅसिलिटी पण घेऊ इच्छित आहे.”, असंही त्या डॉक्टरने सांगितलं.
मीडिया रिपोर्टनुसार, “हॉटेलमध्ये एक रात्र थांबण्यासाठी दहापट भाडं वसूल केलं जात आहे.” अहमदाबादमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील पाच सामने खेळवले जाणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. 46 दिवस वनडे वर्ल्ड कप स्पर्धा असणार आहे. एकूण दहा संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. अंतिम फेरीपर्यंत 48 सामने होणार आहेत.