मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे. या सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मरिन ड्राईव्हच्या शेजारीच असलेल्या वानखेडे स्टेडियमकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्टेडियमच्या बाहेरील बंदोबस्त आणखी वाढवला आहे. वानखेडे स्टेडियममध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी थांबवून घेतलं आहे. स्टेडिअमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
वानखेडे स्टेडियम च्या परिसरातील सर्व बंद आणि बाहेर रस्त्यावर उभी असलेली वाहन तपासून वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात आली आहे. पोलीस प्रत्येकाची चौकशी करून त्याचं तिकिट पाहून स्टेडियममध्ये त्याला तिकीट तपासून पाठवत आहेत. आजच्या सामन्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून सात पोलीस उपायुक्त तसेच 200 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वानखेडे स्टेडियमच्या सर्व गेटसमोर वाहने लावण्यास मनाई केली आहे. ज्वलनशील पदार्थ, आक्षेपार्ह्य वस्तू, तंबाखूजन्य पदार्थ आणि इ. गोष्टींवर बंदी घातली असून चाहत्यांना आतमध्ये नेता येणार नाही.
वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.
वर्ल्ड कप साठी न्यूझीलंडचा संघ: केन विल्यमसन (C), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.