मुंबई : सध्या वर्ल्ड कप 2023 चालू आहे. तर अनेक सामन्यांदरम्यान काही खेळाडूंना दुखापत झाल्याचं आपण पाहिलं आहे. यामध्ये आता भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. हार्दिकप्रमाणे इतर कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यानंतर तातडीने कोणीतरी मैदानावर येतो आणि जखमी खेळाडूवर उपचार करतो. तर बहुतेक जणांना प्रश्न पडला असेलच की खेळाडूंवर तातडीनं नेमके काय उपचार केला जातो? तर आता आपण याबाबत जाणून घेणार आहोत. सोबतच आपण काही अशा सामान्य दुखापतींबाबत जाणून घेणार आहोत ज्याचा खेळाडूंना सामना करावा लागतो.
– बर्याचदा खेळाडूंना नाकाच्या दुखापतीचा सामना करावा लागतो. यामध्ये खेळाडूच्या नाकातून रक्त येणे किंवा नाकाचे हाड तुटणे अशा समस्या निर्माण होतात. नाकाची समस्या खेळाडूंच्या सामान्य दुखापतींपैकी एक आहे.
– खेळाडूंची सर्वात सामान्य दुखापत म्हणजे पायाला चमक येणे. बऱ्याचदा सामन्यादरम्यान खेळाडूंचा पाय चमकतो किंवा मुरगळतो, तर ही अगदी सामान्य दुखापत मानले जाते.
– सामन्यादरम्यान जोरात धावल्यामुळे किंवा उडी मारल्यामुळे फ्रॅक्चरची समस्या निर्माण होताना दिसते. अनेक खेळाडूंना या समस्येचा सामना करावा लागला आहे.
– बऱ्याच खेळाडूंच्या गुडघ्याच्या सांध्याला दुखापतीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या देखील खेळाडूंच्या सामान्य दुखापतींपैकी एक आहे.
बऱ्याचदा जोरात झटका बसल्यामुळे स्नायू फाटण्याची समस्या देखील खेळाडूंमध्ये निर्माण होते. ही समस्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात त्रास देते.
सामन्यादरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर RICE ही थेरेपी दिली जाते. RICE म्हणजे Rest, Ice, Compression, Elevation
विश्रांती (Rest) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर त्यांना विश्रांती दिली जाते. खेळाडूला जिथे जखम झाली आहे त्या भागाला आधार देऊन खेळाडूला विश्रांती दिली जाते. तसंच 48-72 तास दुखापत झालेल्या भागांना वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाते.
बर्फ (Ice) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर 48-72 तासांमध्ये दर दोन तासांनी झालेल्या जखमेवर बर्फ लावला जातो. यामुळे खेळाडूंना आराम मिळतो.
कम्प्रेशन (Compression) – खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर त्यांच्या वेदनादायक भागावर लवचिक पट्टी लावली जाते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
उंची (Elevation) – जेव्हाही खेळाडूला दुखापत होते तेव्हा त्यांचा दुखापतग्रस्त भाग त्यांच्या हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवला जातो.