मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कप2023 मध्ये भारताचं पारडं जड वाटत असलं तरी कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. क्रिकेटमध्ये सामन्याचं चित्र पालटायला जास्त वेळ लागत नाही. यंदाच्या वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये आर अश्विन याला संधी मिळाली. अक्षर पटेल याला दुखापत झाल्याने अश्विनला वर्ल्ड कपसाठी घेण्यात आलं. 2011 साली वर्ल्ड कप संघातील अश्विन यंदाही वर्ल्ड कप खेळणारा दुसराच खेळाडू आहे. अश्विनला संघात घेतल्यावर संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच यावर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने अश्विनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अश्विनला संघात घेतल्यावर विरोधी संघामध्ये जास्त डावखुरे फलंदाज असतील तर त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र हरभजन सिंह याच्या मते अश्विनला प्रत्येक सामन्यात संधी द्यायला हवी. टीम मॅनेजमेंटन यावर परत एकदा विचार करायला हवा. जर मी संघाचा कर्णधार असतो तर पाच गोलंदाजांमध्ये अश्विन माझा दुसरा किंवा तिसरा गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे.
अश्विनकडे तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. कसोटी, वन डे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये अश्विनने दमदार कामगिरी केली आहे. अश्विनचा अनुभव पाहता त्याला संघात घेतल्यावर त्याच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल. मात्र त्याची संघात निवड झाल्यावर काहींनी निवड समितीवर निशााणा साधला.
दरम्यान, आर. अश्विन हा रेड बॉल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपली छाप पाडू शकतो तशी तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये फारसा काही करू शकणार नाही, असं क्रिकेट वर्तुळात बोललं जात आहे. अश्विनला संघात जागा मिळाली असली तरी अंतिम 11 मध्ये स्थान मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.