मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील फायनलसह इतर सामन्यातील खेळपट्ट्यांबाबत रेटिंग दिलं आहे. फायनल, दुसरी सेमीफायनलसह सहा सामन्यातील खेळपट्ट्यांचा दर्जा आयसीसीने ठरवला आहे. आयसीसीने स्पर्धेतील 11 पैकी 6 सामन्यातील खेळपट्टींना ‘सरासरी’ रेटिंग दिलं आहे. यात पाच टीम इंडिया खेळलेल्या सामन्यांचा समावेश आहे.वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला होता. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना कोलकात्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळला गेला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने अंतिम सामन्यासह टीम इंडियाने खेळलेल्या इतर चार सामन्यातील खेळपट्टीचा दर्जा सरासरी असल्याचं सांगितलं आहे. यात 8 ऑक्टोबरला चेन्नईत खेळलेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये खेळलेला भारत विरुद्ध पाकिस्तान, 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये खेळलेला भारत विरुद्ध इंग्लंड सामना आणि 5 नोव्हेंबरला कोलकात्यात खेळलेला भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका या सामन्यांचा समावेश आहे.
अहमदाबादमध्ये टीम इंडिया दोन सामने खेळली होती. यात भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यांचा समावेश आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध विजय, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचं तोंड पाहिलं होतं. दोन्ही वेळेस खेळपट्टी सरासरी असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने खेळपट्टी चांगली असल्याचं सांगितलं होतं.
आयसीसीने कोलकात्यात खेळल्या गेलल्या दुसरा उपांत्य फेरीतील खेळपट्टीला सरासरी गुणांकन दिलं आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेत खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून जिंकला होता. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दुसरीकडे, भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या मैदानातील खेळपट्टीला आयसीसीने क्लिन चिट दिली आहे. या खेळपट्टीबाबत आंतरराष्ट्रीय मीडियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बीसीसीआय आणि टीम इंडियावर खेळपट्टी बदलण्याचा आरोप केला होता. यावर आयसीसीने स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, भारत आणि न्यूझीलंड सामन्यासाठी खेळपट्टी पहिल्यापासूनच ठरली होती.