मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तर त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्याचं आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये केलं गेलय. तर त्यानंतर होणारा सामना हा संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी अतिशय महत्तावाचा आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे. वर्ल्ड कप पेक्षा या सामन्याबाबत क्रिकेट चाहते उत्सूक झाले आहेत. मात्र या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्याची तारीख बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना 15 ऐवजी 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येऊ शकतो. म्हणजेच नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही मॅच खेळवण्यात येऊ शकते.
वर्ल्ड कप दरम्यान नवरात्रीचा सण असणार आहे. गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी करण्यात येते. तसेच ठिकठिकाणी गरबा आणि दांडीयाचं आयोजन केलं जातं. याच नवरात्री उत्सवामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
सुरक्षा यंत्रणांनी सामन्याची तारीख बदलण्यात यावी,असा सल्ला बीसीसीआयला दिला दिला होता. नवरात्री आणि त्यात हा हायव्होल्टेज सामना यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तारीखेत बदल करण्याचा विचार केला गेल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या तारखेसह अनेक बदल हे वर्ल्ड कप वेळापत्रकात करण्यात येणार आहेत. या सर्व बदलांबाबत 31 जुलैपर्यंत घोषणा करण्यात येऊ शकते. वेळापत्रकात बदल होऊ शकतात, असं बीसीसीआय सचिव यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे आता कशाप्रकारे या वेळापत्रकात बदल होतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.