मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील काही सामने शिल्लक आहेत. पण उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कारण पाकिस्तानचं उपांत्य फेरीत स्थान मिळवणं खूपच कठीण आहे. पाकिस्तानला 250 ते 300 धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करावं लागेल. त्यामुळे हे गणित क्रिकेटच्या पटलावर तरी कठीण आहे. त्यामुळे उपांत्य पेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत सामना झाला होता. हा सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
9 जुलै 2019 रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 50 षटकात 8 गडी गमवून 239 धावा केल्या आणि विजयासाठी 240 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाचा व्यत्यय आल्याने सामना राखीव दिवशी खेळला गेला. पण या धावांचा पाठलाग करताना धावांची फलंदाजी ढासळली. भारताचा संपूर्ण संघ 221 धावांवर बाद झाला. भारताचा 18 धावांनी पराभव झाला. कर्णधार असलेल्या विराट कोहली या पराभवामुळे निराश झाला होता. या सामन्यात रवींद्र जडेजाने 59 चेंडूत 77, धोनीने 72 चेंडूत 50 आणि ऋषभ पंतने 56 चेंडूत 32 धावा केल्या होत्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या 15 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईकर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. दरम्यान साखळी फेरीत झालेल्या सामन्यात रोहित शर्मा 4 धावा करून बाद झाला होता. तर सूर्यकुमार यादवही हवी तशी कामगिरी शकला नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. 1999 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ भिडले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 1 धावेनी जिंकला होता. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याची दक्षिण अफ्रिकेला बऱ्याच वर्षानंतर संधी आली आहे.