Team India : उपांत्य फेरीसाठी टीम इंडियाची खास रणनिती, मोक्याची क्षणी गोलंदाज बजावणार मोठी भूमिका!

| Updated on: Nov 09, 2023 | 6:24 PM

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने धडक मारली आहे. साखळी फेरीत चूक दुरुस्त करण्याची संधी असते. पण नॉक आऊट सामन्यात एक चूक महागात पडू शकते. त्या जखमा कधीच भरून निघत नाही. त्यामुळे नॉक आऊट सामन्यासाठी टीम इंडियाने खास रणनिती आखली आहे.

Team India : उपांत्य फेरीसाठी टीम इंडियाची खास रणनिती, मोक्याची क्षणी गोलंदाज बजावणार मोठी भूमिका!
टीम इंडियाने नॉक आऊट सामन्यासाठी काढलं ब्रह्मास्त्र! गोलंदाजांच्या खांद्यावर असेल धुरा
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त खेळीचं दर्शन दिलं आहे. साखळी फेरीतील 8 पैकी 8 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. आता जेतेपदापासून टीम इंडिया अवघी दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असं साधं गणित आहे. पण साधं गणित सोडवणं वाटते तितकं सोपं नाही. साखळी फेरीत एखाद दुसरा पराभव झाला तर चूक दुरुस्त करण्याची संधी असते. पण नॉक आऊट सामन्यात पराभव म्हणजे थेट घरचा रस्ता…उपांत्य फेरीत भारतासमोर कोणाचं आव्हान असेल हे लवकरच स्पष्ट होईल. साखळी फेरीत नेदरलँडसोबत शेवटचा सामना आहे. पण टीम इंडियाने उपांत्य फेरीसाठी तयारी सुरु केली आहे. उपांत्य फेरीत एखादी चूक महागात पडू शकते. त्यामुळे टीम इंडिया कोणतीच जोखिम पत्कारू इच्छित नाही. म्हणूनच या कामगिरीसाठी गोलंदाजांना खास ट्रेनिंग दिलं जात आहे. गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना नेटमध्ये फलंदाजीची प्रॅक्टिस दिली जात आहे. शेवटपर्यंत लढा देण्यासाठी ही रणनिती आखली जात आहे.

स्टार स्पोर्ट्सने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज फलंदाजी करताना दिसत आहेत. 2011 वर्ल्डकप जिंकल्यानंतर नॉक आऊट सामन्यात भारताची कामगिरी सुमार राहिली आहे. 2019 मध्ये न्यूझीलंडने उपांत्य फेरीत भारताला पराभूत केलं होतं. 2022 टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे टीम इंडिया गोलंदाजांना फलंदाजीसाठी तयार करत आहे. यासाठीच बुमराह आणि सिराजला नेट प्रॅक्टिस देण्यात येत आहे.

भारताने आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. उपांत्य फेरीत सर्वच पातळीवर सक्षम राहाणं गरजेचं आहे. वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्माने याबाबत आपलं म्हणणंही मांडलं होतं. फलंदाजांना मोक्याच्या क्षणी फलंदाजी करावी लागेल असं सांगितलं होतं. त्याच रणनितीचा हा भाग आहे.

टीम इंडिया स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.