World Cup : दक्षिण अफ्रिकेला पराभूत करण्यात नेदरलँडच्या फूड डिलिव्हरी बॉयचं योगदान, त्या ट्वीटमुळे पुन्हा चर्चा

| Updated on: Oct 18, 2023 | 4:03 PM

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडने पुन्हा एकदा मोठा उलटफेर करून दाखवला आहे. फॉर्मात असलेल्या दक्षिण अफ्रिका संघाला पराभूत केलं. या सामन्यात नेदरलँडच्या पॉल वॅन मीकरेन याने महत्त्वाची भूमिका बजावली.

World Cup : दक्षिण अफ्रिकेला पराभूत करण्यात नेदरलँडच्या फूड डिलिव्हरी बॉयचं योगदान, त्या ट्वीटमुळे पुन्हा चर्चा
World Cup : फूड डिलिव्हरी बॉयने दक्षिण अफ्रिकेला पाजलं पराभवाचं पाणी, ते ट्वीट पुन्हा होतंय व्हायरल
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कधी कोणता संघ आश्चर्याचा धक्का देईल सांगता येत नाही. नेदरलँड आणि अफगाणिस्तानने असं करून दाखवलं आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहे. मंगळवारी नेदरलँडने दक्षिण अफ्रिकेला 38 धावांनी पराभूत केलं. पावसाच्या व्यत्ययामुळे 43 षटकांचा सामना करण्यात आला होता. नेदरलँडने 7 गडी गमवून 245 धावा केल्या आणि विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्वबाद 207 धावाच करू शकला. या विजयात नेदरलँडच्या पॉल वॅन मीकेरेन याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 9 षटकात 40 धावा देत 2 गडी बाद केले. दोन महत्त्वाचे खेळाडू बाद केल्याने सामन्याचं स्वरूपच बदलून गेलं.

पॉलने एडन मार्करम आणि मार्को जानसन यांना बाद करत सामन्यावर पकड मिळवली. हे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर टिकले असते तर सामन्याचं चित्र पालटून टाकलं असतं. पण मीकेरेनच्या भेदक गोलंदाजीमुळे सामना नेदरलँडच्या बाजूने फिरला. या सामन्यातील विजयानंतर मीकेरेन चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. पॉल वॅन मीकेरेन याचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण पॉल दोन वर्षांपूर्वी डिलिव्हरी बॉयचं काम करायचा.

मीकेरेन याने नोव्हेंबर 2020 मध्ये स्वत: याबाबतचा खुलासा केला होता. मीकेरेनला कोरोना संकटात उबेर ईट्समध्ये फूड डिलिव्हरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. आर्थिक स्थिती ढासळली होती. त्याने ट्वीट करत लिहिलं होतं की, ‘आज क्रिकेट खेळायला पाहीजे होतं. पण मी थंडीच्या महिन्यात उबेर ईट्समध्ये फूड डिलिव्हरी करत आहे. आश्चर्याची गोष्ट आहे सर्व काही एका झटक्यात बदलतं. लोकांनी हसत राहावं.’

पॉल वॅन मीकेरेन याने ऑक्टोबर 2020 मध्ये फूड डिलिव्हरीचं काम सुरु केलं होतं. कारण त्या वर्षी भारतात होणारा टी20 वर्ल्डकप स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन यूएईत करण्यात आलं होतं. कोरोनामुळे काही काळ क्रिकेट स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि स्पर्धा सुरु झाल्या. मीकेरेने वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत आहे.