मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला मोजून 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेट महाकुंभासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट टीमने प्रिलिमिनरी टीम जाहीर केली. इंग्लंडने बुधवारी 16 ऑगस्ट रोजी वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स याने वर्ल्ड कपसाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेत वनडे क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. स्टोक्सच्या या निर्णयामुळे एका झटक्यात इंग्लंड क्रिकेट टीमची ताकद झटक्यात वाढली.
तसेच इंग्लंड वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बेन स्टोक्स आणि संपूर्ण इंग्लंड टीमला वर्ल्ड कपआधी याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच 1 वर्षानंतर स्टोक्स कशी कामगिरी करतो, याकडेही सर्वच संघांचं लक्ष असणार आहे.
स्टोक्स याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी मोठी मागणी केली आहे. स्टोक्सप्रमाणे आता महेंद्र सिंह धोनी याने टीम इंडियासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा आणि वर्ल्ड कपमध्ये खेळावं, अशी मागणी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. जर स्टोक्स इंग्लंडच्या फायद्यासाठी निर्णय फिरवू शकतो, मग धोनी का नाही, असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
टीम इंडियाला गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वातच 23 जून 2013 रोजी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. तर त्याआधी धोनीच्या कॅप्टन्सीत भारतात 2011 साली झालेला वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाला गेल्या 3 वर्ल्ड कपमध्ये यश आलं नाही.
धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे, हे त्याचे आकडेच सांगतात. महेंद्रसिंह धोनी याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी या आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीने खूपदा टीम इंडियाला एकहाती सामने जिंकून दिलेत. तसचे धोनी मैदानात आहे, इथेच टीम इंडियाची बाजू आणखी मजबूत होते. त्यामुळे धोनीचं उपस्थिती टीम इंडियासाठी किती महत्वाची आहे, हे यातून सिद्ध होतं.
आता धोनी स्टोक्स प्रमाणे निवृत्तीचा निर्णय मागे घेईल अथवा नाही, ही नंतरची बाब. मात्र धोनीने परत यावं आणि टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, ही क्रिकेट रसिकांची इच्छा आहे इतकं मात्र नक्की.