नेदरलँड सामन्यापूर्वी राहुल द्रविडनं रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं विधान, म्हणाला…

| Updated on: Nov 11, 2023 | 7:20 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. हा सामना जिंकताच भारत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकणारा पहिला संघ ठरेल. या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेला सामोरं गेला.

नेदरलँड सामन्यापूर्वी राहुल द्रविडनं रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं विधान, म्हणाला...
भारत नेदरलँड सामन्यापूर्वी राहुल द्रविडची पत्रकार परिषद, रोहित शर्माबाबत स्पष्टच सांगितलं की.
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. टीम इंडिया जेतेपदापासून अवघी दोन पावलं दूर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभूत झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा टी20 सामने खेळला नाही. तसेच त्याबाबत काही वाच्यता देखील नाही. तेव्हा वनडे वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं रोहित शर्मा वारंवार सांगत होता. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरीतील दोन विजय मिळवताच रोहित शर्मा नवा हिरो ठरणार आहे. दरम्यान, साखळी फेरीतील नेदरलँड विरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेतली. यात त्याने रोहित शर्माचं तोंड भरून कौतुक केलं. टीम इंडियाला वनडे वर्ल्डकपमध्ये जो सूर गवसला आहे, त्यात रोहित शर्माची मुख्य भूमिका आहे.

राहुल द्रविडने सांगितलं की, रोहित शर्मा एक चांगलं नेतृत्व आहे. त्याने मैदानात आणि मैदानाबाहेर याचं उत्तम उदाहरण दिलं आहे. स्पर्धेतील काही सामने आमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकले असते. पण त्या सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे आम्हाला यश मिळवणं सोपं झालं. रोहित शर्माने टीम गरज ओळखून खेळाचं प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील इतर खेळाडूंवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्याने ज्या पद्धतीने आक्रमक सुरुवात करून दिली त्यामुळे टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला आहे.

“आम्ही एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याबाबत चर्चा करत असतो. पण जिथपर्यंत तुमचं नेतृत्व करणारा असं करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नसतो. रोहितने खूप चांगली कामगिरी केली आह. खरंत त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मला वाटतं त्याचं कर्णधारपदाची कारकिर्द चांगली राहिली आहे. तो एक असा खेळाडू आहे की, त्याच्यामुळे खेळाडू आणि कोचिंग स्टाफला सन्मान मिळाला आहे.”, असंही राहुल द्रविड म्हणाला. टीम इंडियाचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे.