SA vs AUS : क्विंटन डिकॉकचा धमाका, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 312 धावांचं आव्हान

| Updated on: Oct 12, 2023 | 6:13 PM

World Cup 2023, SA vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दहावा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान ऑस्ट्रेलिया गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.

SA vs AUS : क्विंटन डिकॉकचा धमाका, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 312 धावांचं आव्हान
SA vs AUS : ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 312 धावांचं लक्ष्य, आव्हान गाठणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त फॉर्म दिसत आहे. पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर रचत वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचला होता. तसेच श्रीलंकेला 102 धावांनी पराभूत केलं होतं. आता ऑस्ट्रेलियासमोररही दक्षिण आफ्रिकेचा बोलबाला पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेनं 7 गडी गमवून 311 धावा केल्या आणि विजयासाठी 312 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात क्विंटन डिकॉकचं शतक आणि एडन मार्करमचं अर्धशतक चर्चेत राहिलं.

क्विंटन डिकॉक याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. तर एडन मार्करम याने 44 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2, जोश हेझलवूडने 1, ग्लेन मॅक्सवेलने 2, पॅट कमिन्सने 1 आणि अॅडम झाम्पाने 1 गडी बाद केला.

क्विंटन डिकॉक याचा हा तिसरा वनडे वर्ल्डकप आहे. यापूर्वी 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्ये 17 सामने खेळला होता. मात्र त्यात एकही शतक ठोकता आलं नाही. करियरच्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये डिकॉकची बॅट मात्र चांगलीच तळपळी आहे. सलग दोन सामन्यात शतक ठोकलं आहे. वर्ल्डकपमध्ये सलग दोन शतकं ठोकत डिकॉकने दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. हाशिम अमला, फाफ डुप्लेसी, हर्शल गिब्स यांच्या पंगतीत स्थान मिळालं आहे. त्यांच्या नावावर वनडे वर्ल्डकपमध्ये दोन शतकं आहेत. तर डिव्हिलियर्सने चार शतकं ठोकली आहे.

डिकॉकने वनडे करियरमधील 19वं शतक ठोकलं आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध हे तिसरं शतक आहे. पॅट कमिन्स याच्या चेंडूवर षटकार मारून त्याने शतक पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीला येत शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. हाशिम अमला 27, क्विंटन डिकॉक 19, हर्शल गिब्स 18, गॅरी कर्स्टन 13 आणि ग्रीम स्मिथ 10 अशी सलामी आलेल्या शतकवीरांची यादी आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.