मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना म्हणजे दोन्ही देशांच्या क्रीडाप्रेमींसाठी मिनी वर्ल्डकपच असतो. वर्ल्डकप जेतेपद मिळो अगर नको..हा सामन्यात विजय मिळालाच पाहीजे अशी मानसिकता असते. त्यामुळे या सामन्यात दोन्ही देशांच्या खेळाडूंवर जबरदस्त दबाव असतो. पराभव जिव्हारी लागला की अनेकजण टीव्ही फोडण्यापर्यंत मजल मारतात. पण हा एक खेळ असून यात कधीही काहीही होऊ शकतं याचं भान देखील ठेवणं गरजेचं आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. आता दोन्ही संघ वनडे वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज असून जोरदार सराव सुरु आहे. दुसरीकडे या सामन्यात कोणते खेळाडू बेस्ट ठरतील याबाबतही आकलन केलं जात आहे. चला जाणून घेऊयात याबाबत
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पुरक आहे. त्यामुळे गोलंदाजांसाठी मोठी कसोटी असणार आहे. दुसऱ्या डावात दव देखील गोलंदाजांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला तर प्रथम फलंदाजी करणं पसंत केलं जाईल. या सामन्यात मोठी धावसंख्या होईल असा अंदाज आहे. अहमदाबादमध्ये शनिवारी तापमान 36 अंश सेल्सियसच्या आसपास असेल. तर आर्द्रता 56 टक्क्यांपर्यंत असेल.
भारत आणि पाकिस्तान संघ 134 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तान वरचढ ठरला आहे. पाकिस्ताने 73 सामन्यात, तर भारताने 56 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात कोणताही निकाल आलेला नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या सातही सामन्यात विजय मिळवला आहे.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीप), सउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन/शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज