मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तसेच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उर्वरित दोन संघांसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारताची स्पर्धेतील कामगिरी पाहून पाकिस्तानला पोटशूल झाला आहे. भारताचा विजयरथ कसा रोखावा यासाठी पाकिस्तानमध्ये जोरदार डिबेट सुरु आहे. यात भारताला रोखण्यासाठी काही अजब सल्ले देण्यात आले. हे सल्ले ऐकून कोणालाही हसू येईल. पाकिस्तानच्य ए स्पोर्ट्स चॅनेलवर क्रिकेटबाबतीत चर्चा असते. या चर्चेदरम्यान भारताला रोखण्यासाठी अजब सल्ला दिला. भारताला कसं रोखता येईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वसीम अक्रमने सांगितलं की, ‘हा प्रश्न प्रत्येक संघाच्या डोक्यात असेल. मग ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका असो की न्यूझीलंड. कारण हा संघ खरंच चांगला खेळत आहे.’
वसीम अक्रमचं उत्तर संपल्या संपल्या अँकरने सांगितलं की, “वसीम अक्रम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की भारताला पराभूत करण्यासाठी एकच उपाय आहे. तो म्हणजे खेळाडूंची बुटं आणि बॅट चोरा.” पण अँकर इतक्यावरच थांबला नाही. त्याने या उपायाची री ओढत आणखी एक सल्ला दिला. ‘मला वाटतं टीमच्या बसला टायर पंचर करावा. जेणेकरून टीम इंडिया मैदानात पोहोचणारच नाही.’ हा सल्ला ऐकून उपस्थित सर्वच हसायला लागले. हे सर्व संभाषण मस्करीत केलं जातं होतं.
How to stop Team India in this World Cup? pic.twitter.com/mcELprPote
— Cricketopia (@CricketopiaCom) November 6, 2023
टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. याबाबत मिस्बाह उल हकने सांगितलं की, ‘उपांत्य फेरीचं गणित वेगळी असतात. जितकं टीम चांगली खेळते तितक्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे भारताला दबाव झेलणं खूपच कठीण होईल.’ दुसरीकडे, शोएब मलिकने त्याला अडवत सांगितलं की, “भारत एक असा संघ आहे की दबावात सर्वात्तम कामगिरी करतो.”