मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मुलाखतीत आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. सिडनी हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत डेव्हिड वॉर्नरने सांगितलं की, “क्रिकेट मंडळाने माझ्या कर्णधारपदावर घातलेले निर्बंध अपमानजनक आहे. मंडळाने यावर तोडगा काढण्याऐवजी हा मुद्दा ताणून धरला आहे. असं वागणं खरंच निराशाजनक आहे. असं अजिबात होता कामा नये.” डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावर 2018 मध्ये आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या नियमावलीत काही बदल केले आहेत. त्या अंतर्गत वॉर्नरने आपल्यावरी बंदी हटवण्याची मागणी केली होती. मात्र मंडळाने या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.
वॉर्नरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याचिका दाखल केली होती. कर्णधारपदाबाबत लावलेली बंदी मागे घेण्याची मागणी वॉर्नरने याचिकेत केली होती. ” या प्रकरणामुळे मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. कसोटी सामन्यात मला वारंवार वकिलांचे फोन आले आणि मला त्यांच्याशी बोलावं लागत होतं. हे माझ्यासाठी अपमानजनक असून मी निराश आहे.”
“त्यांचा हेतू मला अपमानित करण्याचा आहे. मी पॅनेलकडे बंद खोलीत सुनावणी करा. पण ते याची चर्चा सार्वजनिकपणे करू इच्छितात. असं वागणं बरोबर नाही.”, असं डेव्हिड वॉर्नरने सांगितलं.
डेव्हिड वॉर्नरवर 2018 मध्ये बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असातना सँड पेपर गेट प्रकरण घडलं होतं. यात कॅमरून बॅनक्रॉफ्ट चेंडूला काही तरी घासताना दिसला होता. बॉल टेंपरिंग करत असल्याचं निष्पन्न झालं होतं. यात कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर सामील असल्याचं पुढे आलं होतं.
या प्रकरणानंतर कर्णधार आणि उपकर्णधारावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर बॅनक्रॉफ्ट याच्यावर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या दरम्यान वॉर्नरवर आजीवन कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. सामन्यासाठी 12 जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली आहे. पहिल्यांदा न्यूझीलंडने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं.