मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या मोसमातील दुसऱ्या सामन्यात विजयासाठी 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच खेळवण्यात येत आहे. या सामन्यात तोडफोड बॅटिंग करत दिल्लीने बंगळुरला विजयासाठी 224 तगडं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून शफाली वर्माने 84 तर कॅप्टन मेग लॅनिंगने 72 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मारिजाने कॅप हीने मोठे फटके मारले. तसेच जेमिमाह रॉड्रिग्सने हीनेही आरसीबीच्या गोलंदाजांना चोपलं बंगळुरुकडून हेदर नाइट हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
आरसीबीने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने या संधीचा पूरेपूर फायदा घेतला. शफाली आणि मेग या सलामी जोडीने 162 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघीनी वैयक्तिक अर्धशतकं ठोकली. अर्धशतकानंतर दोघींनी टॉप गिअर टाकत तुफान फटकेबाजी केली.
बंगळुरुच्या हेदर नाइट हीने ही सेट जोडी फोडली. विशेष म्हणजे तिने एकाच ओव्हरमध्ये या दोन्ही सेट ओपनर बॅट्समनचा काटा काढला. नाईटने आधी मेग आणि त्यानंतर शफालीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मेगने 43 बॉलमध्ये 14 फोरच्या मदतीने 72 धावा केल्या.
तर शफालीने 45 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 186 च्या कमाल स्ट्राईक रेटने 84 धावा केल्या.
दोन्ही सेट बॅट्समन आऊट झाल्यानंतर काप आणि जेमिमाह रॉड्रिग्ज या दोघींनी शेवटपर्यंत फटकेबाजी केली. कापने 17 बॉलमध्ये 39* आणि जेमिमाहने 22* धावा केल्या. आरसीबीकडून क्नाईटने 2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 200 पेक्षा अधिक धावांचं टार्गेट दिलं आहे. मोसमातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोर 208 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. तर आता दिल्लीने मुंबईला मागे टाकत आरसीबीला विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मॅग लँनिंग (कर्णधार) शफाली वर्मा, मारिजाने कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), सोफी डिवाइन, दिशा कसट, एलिस पॅरी, रिचा घोष, हेदर नाइट, कनिका आहूजा, आशा शोभना, मेगन शूट, प्रीति बोस आणि रेणुका सिंह.