नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमात आज रविवारी (5 मार्च) डबल हेडर सामने खेळवण्यात आले. या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने आरसीबीचा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातचा हा गेल्या 24 तासातील सलग दुसरा पराभव ठरला. युपीने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावांचं आव्हान पूर्ण केलं. सोलापूरची मराठमोळी किरन नवगिरे आणि ग्रेस हॅरीस या दोघी यूपीच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
ग्रेस हॅरीसने निर्णायक क्षणी मैदानात शेवटपर्यंत उभी राहत 59 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. सोफी एक्लेस्टोनने ग्रेसला चांगली साथ दिली. विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या यूपीने चौथ्या विकेटच्या भागीदारीचा अपवाद वगळता ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे यूपीची स्थिती 7 बाद 105 अशी झाली होती.
मात्र ग्रेस आणि सोफी या दोघींनी विजयी नाबाद भागीदारी रचली. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 70 धावांची पार्टनरशीप केली. सोफीने नाबाद 22 धावा केल्या. ग्रेस आणि सोफीच्या आधी सोलापूरकर किरन नवगिरे हीने यूपीचा डाव सावरला.
एकाबाजूला यूपीचे झटपट विकेट जात होते. तर दुसऱ्या बाजूला किरन मैदानात घट्ट पाय रोवून उभी होती. किरनने 53 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीत किरनने 43 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्स खेचले.
किरन, ग्रेस आणि सोफी या तिघांव्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीला एकटीलाच दुहेरी आकडा गाठता आला. दीप्तीने 11 धावा जोडल्या. तर 2 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. तर 3 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
गुजरातकडून कीम गर्थने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर अॅनाबेल सदरलँड आणि मानसी जोशी या दोघींनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. गुजरातकडून हर्लीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या.
त्याशिवाय एश्ले गार्डनर हीने 25, ओपनर सब्भिनेनी मेघना 24, दयालन हेमलथा 21 आणि सोफिया डंकले हीने 13 धावा केल्या. तर उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकड्यातला धावा करता आल्या नाहीत.
युपीकडून दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टोन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अंजली सरवाणी आणि ताहलिया मॅकग्राने 1 विकेट घेतली.
यूपी वॉरियर्झ प्लेइंग इलेव्हन | अॅलिसा हिली (कॅप्टन/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी आणि राजेश्वरी गायकवाड.
गुजरात प्लेइंग इलेव्हन | स्नेह राणा (कॅप्टन), सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा (विकेटकीपर), ऍशलेह गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलथा, हर्लिन देओल, किम गर्थ, मानसी जोशी आणि तनुजा कंवर.