मुंबई | वूमन्स आयपीएल 2023 स्पर्धेतील चौथा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात आरसीबीने मुंबईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीचा डाव 18.4 ओव्हरमध्ये 155 धावांवर आटोपला. आरसीबीकडून कॅप्टन स्मृती मंधाना आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 23 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून हॅली मॅथ्यूजने 3 विकेट्स घेतल्या.
आरसीबीकडून सर्वाधिक रिचा घोष हीने 28 धावा केल्या. स्मृती आणि श्रेयांका या दोघींनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कनिका आहुजा 22 रन्स करुन माघारी परतली. तर मेगन शूट हीने 20 धावा केल्या. सोफी डिवाइन हीने 16 तर एलिस पॅरीने 13 धावा जोडल्या. आरसीबीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना हात खोलून दिले नाहीत.
मुंबईच्या हॅली मॅथ्यूजचा अपवाद वगळता साईका इशाक आणि अमेलिया केर या दोघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नॅट ब्रंट आणि पूजा वस्त्राकर या जोडीने 1 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
मुंबईने या स्पर्धेतील सलामीचा सामना 143 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तर आरसीबीला 5 मार्चला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आरसीबी हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असेल. तर मुंबईचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा मानस असेल. आता यात कोण यशस्वी ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), दिशा कसाट, एलिस पॅरी, सोफी डिवाइन, रिचा घोष, हेदर नाइट, श्रेयंका पाटिल, कनिका आहूजा, मेगन शूट, रेणुका सिंह आणि प्रीति बोस
मुंबई इंडियंस प्लेइंग इलेवन | हरमनप्रीत कौर (कर्णधार) यास्तिका भाटिया, हॅली मॅथ्यूज, नॅट ब्रंट, अमेलिया केर, हुमैरा काजी, पूजा वस्त्राकर, इजी वॉन्ग, कालिता आणि सायका.