मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठीचा लिलाव नुकताच पार पडला. पाच संघांनी या लिलावातून दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आहे. बीसीसीआयने देखील दुसऱ्या पर्वासाठी जोरदार तयारी केली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार स्पर्धेचं आयोजन 22 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. दुसऱ्या पर्वात एकाच ठिकाणी सामने ठेवण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं निवडण्याचा बीसीसीआयचा मानस होता. आता यासाठी बीसीसीआयने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच कारवाँ मॉडेलसाठी दोन ठिकाणं निश्चित केली आहेत. वुमन्स प्रीमियर लीगचं पहिलं पर्व मुंबईतच पार पडलं होतं आहे. आता दुसऱ्या पर्वात बंगळुरु आणि दिल्ली ही दोन ठिकाणं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे बीसीसीआयचं या शिक्कामोर्तब झालं की ही स्पर्धा दोन ठिकाणी खेळली जाईल.
दुसऱ्या पर्वातील पहिल्या टप्प्यातील सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात, नवी दिल्ली अरूण जेटली मैदानात प्लेऑफ आणि अंतिम फेरीचं नियोजन केलं जाईल. बीसीसीआयने इतर ठिकाणींची देखील चाचपणी केली आहे. मुंबई ऐवजी इतर ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्याचा मानस होता. गुजरात सामने भरवण्याचा पर्याय निवडला गेला होता. पण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सामन्यांसाठी मोठं वाटलं. त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरुची निवड केल्याचं बोललं जात आहे.
वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातही 22 सामने खेळले जातील. साखळी फेरीत एकूण 20 सामने खेळले जातील. त्यातील टॉपला असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरी संघाला अंतिम फेरीसाठी लढत द्यावी लागेल. मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदा जेतेपदावर कोण नाव कोरतं? याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, आयपीएल 2024 स्पर्धेसाठीच्या तारखांचा घोळ कायम आहे. आयपीएलसाठी दहा संघ सज्ज असून स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल. पण लोकसभा निवडणुका असल्याने ठिकाणं निवडताना संभ्रम आहे. त्यामुळे आयपीएलमध्येही कारवाँ मॉडेल असेल असं सांगण्यात येत आहे.