मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात युपी वॉरियर्सने दिल्लीवर एका धावेने विजय मिळवला. या विजयासह स्पर्धेतील टॉप थ्रीची चुरस आणखी वाढली आहे. दिल्ली आणि मुंबईचे प्रत्येक 8 गुण, तर आरसीबी आणि युपीचे 6 गुण झाले आहेत. त्यात तळाशी असलेल्या गुजरात जायंट्सने एका सामन्यात विजय मिळवल्याने 2 गुण आहेत. त्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली आहे. त्यामुळे अजूनही कोणाचंही टॉप थ्रीचं निश्चित नाही. आता गुणतालिकेत अव्वल स्थान कोण गाठतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र योग्य ठरला. युपीचा संपूर्ण संघ 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा करू शकला. दिल्लीला होम ग्राउंडवर हे आव्हान सहज सोपं होतं. पण शेवटच्या षटकांमध्ये तळाच्या फलंदाजांनी माती खाल्ली आणि झटपट विकेट टाकल्या.
युपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्मा वगळता एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. दीप्तीने 48 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार एलिसा हिलीची 29 खेळी ही सर्वोत्तम ठरली. या व्यतिरिक्त जवळपास सर्वच फलंदाज एकेरी धावसंख्येवर राहिले. त्यामुळे युपीला 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा करता आल्या. तसेच विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं. पण गोलंदाजीत युपीने कमाल केली. धावांचं अंतर कमी असूनही दिल्लीला पराभवाचं पाणी पाजलं.
Deepti Sharma: 𝙍𝙀𝙈𝙀𝙈𝘽𝙀𝙍 𝙏𝙃𝙀 𝙉𝘼𝙈𝙀 🌪️#DCvUPW #TATAWPL pic.twitter.com/MbeHDG3x4B
— UP Warriorz (@UPWarriorz) March 8, 2024
या विजयाची खरी नायिका ठरली ती दीप्ती शर्मा…19 वं षटक जबरदस्त टाकलं. एकूण तीन गडी बाद करून फक्त पाच धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ बॅकफूटवर आला होता. शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण होतं. पहिल्याच चेंडूवर राधा यादवने षटकार मारला. त्यामुळे 5 बॉल 4 अशी स्थिती आली. त्यानंतर दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर विकेट गेली. चौथ्या चेंडूवर रनआऊट आणि पाचव्या चेंडूवर शेवटची विकेट गेली आणि पराभव झाला.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री, गौहर सुलताना, सायमा ठाकोर.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, तितास साधू