मुंबई : वुमन्स प्रीमियल लीग 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आलेत. मुंबई इंडियन्सनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. रात्रीच्या सत्रात दव पडत असल्याचा अंदाज घेऊन हरमनप्रीत कौर हीने गोलंदाजी स्वीकारली. पाटा विकेट असल्याने धावांचा वर्षाव होईल यात शंका नव्हती. अपेक्षेप्रमाणे दिल्लीने आक्रमक फलंदाजी केली. ॲलिस कॅप्सीने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शफाली वर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर दडपण आलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग आणि ॲलिस कॅप्सी या दोघांनी मोर्चा सांभाळली. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ॲलिस कॅप्सी आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी डाव पुढे नेला. तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली.
ॲलिस कॅप्सी हीने 53 चेंडूत 75 धावा केल्या. यात 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.तर कर्णधार मेग लॅनिंगने 25 चेंडूत 31 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्स 24 चेंडूत 42 धावा करून तंबूत परतली. मुंबई इंडियन्सकडून नॅट सायवर ब्रंटने 2, शबनिम इस्माइलने 1 आणि अमेला केर हीने 1 गडी बाद केला.
आता मुंबई इंडियन्स विजयी सलामी देते की दिल्ली कॅपिटल्स याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने तेव्हा सर्वबाद 18 षटकात 105 धावा केल्या आणि विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 15 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं होतं.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.