मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 8 सामने खेळणार आहे. त्यापैकी प्रत्येक संघाने 4 सामने खेळले आहेत. सध्याचं गुणतालिकेचं गणित पाहता गुजरात जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. चारपैकी एका सामन्यात पराभव झाला तर थेट बाहेरचा रस्ता असणार आहे. त्यामुळे गुजरात जायंट्सला पुढील चारही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. गुजरात जायंट्ससाठी स्पर्धेत करो या मरोची लढाई असणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 संघ आहेत. तसेच साखळी फेरीत एकूण 20 सामने होणार असून प्रत्येक संघ 8 सामने खेळणार आहे. यापैकी टॉप 3 असलेल्या संघाची प्लेऑफमध्ये वर्णी लागेल. गुणतालिकेत 1 नंबरला असलेला संघ थेट अंतिम फेरी गाठेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांच्यात एक सामना खेळावा लागेल. प्लेऑफमधील सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरीत गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाशी लढत होईल.
सध्याची गुणतालिका पाहता दिल्ली कॅपिटल्स 4 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीचा नेट रनरेट +1.251 इतका आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ 4 पैकी 3 सामने जिंकला असून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा कमी आहे. +0.402 मुंबईचा नेट रनरेट आहे. युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या खात्यात प्रत्येकी 4 गुण आहेत. युपीचा नेट रनरेट +0.211 आणि बंगळुरुचा नेट रनरेट -0.015 इतका आहे. त्यामुळे उर्वरित चार सामन्यात थोडी तरी गडबड झाली तर एकाचं आव्हान संपुष्टात येईल.
संघांचे नाव | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
दिल्ली कॅपिटल्स | 4 | 3 | 1 | 6 | +1.251 |
मुंबई इंडियन्स | 4 | 3 | 1 | 6 | +0.402 |
युपी वॉरियर्स | 4 | 2 | 2 | 4 | +0.211 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 4 | 2 | 2 | 4 | -0.015 |
गुजरात जायंट्स | 4 | 0 | 4 | 0 | -1.804 |