WPL 2024, RCB vs GG : गुजरातसाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली फलंदाजी

| Updated on: Mar 06, 2024 | 7:10 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 13वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. बंगळुरुने हा सामना जिंकला तर टॉपला पोहोचेल. तर गुजरातचा पराभव झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

WPL 2024, RCB vs GG : गुजरातसाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत घेतली फलंदाजी
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्लीत होत आहेत. त्यामुळे खेळपट्टी बदलल्याने खेळाडूंचा खेळण्याचा अंदाजही बदलणार आहे. मंगळवारी मुंबई दिल्ली यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीला होम ग्राउंडचा जबरदस्त फायदा झाला. दिल्लीने मुंबईला 29 धावांनी पराभूत केलं. आज या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात लढत होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर गुजरात जायंट्सला सुरुवातीच्या चारही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे या स्पर्धेतील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला आणि स्पर्धेत सुरु असलेल्या ट्रेंड बाजूला सारत कर्णधार बेथ मूनीने फलंदाजी स्वीकारली स्वीकारली.

“आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. आम्ही धाडसी, आणि सकारात्मक होण्याचा प्रयत्न करत आहोत. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आहे. काल रात्री विकेट पाहिल्यावर असा अंदाज आला की दुसऱ्या डावात चेंडू खाली राहतो.कदाचित तितके दव देखील नाही. आमच्या संघात एक बदल केला आहे.”, असं गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनीने सांगितलं.

“आम्हाला पहिल्यांदा फिल्डिंगच करायची होती. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. मागचे दोन तीन दिवस थोडे हेक्टिक गेले. पण मागचा विजय खूपच महत्त्वाचा होता. प्रेक्षकांनी होम ग्राउंडवर चांगली साथ दिली. ट्रॅव्हलिंगमुळे थोडा थकवा होता. पण आता ते सर्व बाजूला सारून पुढे जायचं आहे. संघात कोणताही बदल नाही.”, असं बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधाना हीने सांगितलं.

गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यात दोन सामन्यात बंगळुरुने तर एका सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला पराभूत केलं होतं. आता गुजरात या स्पर्धेत कमबॅक करतं की हाराकिरी सुरुच राहते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, मेघना सिंग, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डेव्हाईन, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग