मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ 8 सामने खेळणार आहे. त्यापैकी प्रत्येक संघाचे 4 सामने खेळून झाले आहेत. आता युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वैयक्तिक पाचवा सामना खेळणार आहेत. या सामन्यातील निकाल खूपच महत्वाचा ठरणार आहे. टॉप 3 मध्ये राहण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय महत्त्वाचा आहे. अन्यथा पुढील प्रवास आणखी कठीण होणार आहे. दरम्यान युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या स्पर्धेत नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेण्याचा ट्रेंड 11 व्या सामन्यातही कायम आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात पडणारं दव यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. अन्यथा धावा रोखण्याचं मोठं आव्हान गोलंदाजांसमोर उभं राहील. युपी वॉरियर्स गुणतालिकेत 4 गुणांसह तिसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 4 गुण आमि -0.015 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे.
युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली म्हणाली, “आम्ही प्रत्येक वेळेप्रमाणे प्रथम गोलंदाजी करू. वातावरण खूप दमट आहे आणि भरपूर ओलावा आहे. नाणेफेक जिंकणे मदत करते. आम्हाला ज्या पद्धतीने खेळायचे आहे ते आम्ही शोधून काढले आहे. खेळाडू योगदान देत आहेत. ही चुरशीची स्पर्धा असणार आहे.”
“आम्हालाही गोलंदाजी करायला आवडले असते. आम्ही दिल्लीला गेलो की आम्हाला तिथेही काही पाठिंबा मिळेल.टी20 क्रिकेटमध्ये गती महत्त्वाची असते. आम्हाला चांगले आणि कठोर क्रिकेट खेळायचे आहे. निगलमुळे श्रेयंका खेळणार नाही. एकता बिश्तला तिच्या जागी संधी मिळेल.”, असं स्मृती मंधाना हिने सांगितलं.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बंगळुरुने युपी वॉरियर्सला पराभूत केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं होतं. पण युपीचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 155 धावा करू शकला आणि बंगळुरुने 2 धावांनी निसटता विजय मिळवला. त्यामुळे आता कोण बाजी मारतं याकडे लक्ष लागून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी