मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या आठव्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे दोन संघ आमनेसामने होते. नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय युपीच्या पथ्यावर पडला. कारण गुजरातला 20 षटकात 5 गडी गमवून 142 धावा करता आल्या आणि विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान युपी वॉरियर्सने 4 गडी गमवून 16 षटकात पूर्ण केलं. युपी वॉरियर्सचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. या विजयासह युपी वॉरियर्सच्या खात्यात आणखी दोन गुणांची भर पडली आहे. तर गुजरात जायंट्सला स्पर्धेतील सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आता पाच सामन्यात गुजरात संघाला स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
गुजरात जायंट्सकडून एकदम धीमी सुरुवात झाली. दहा षटकात 6 च्या सरासरीने धावा झाल्या होत्या. त्यानंतर धावांची गती वाढली पण हवी तशी नाही. त्यामुळे युपी वॉरियर्सला विजय प्रत्येक क्षणी सोपा होत होता. वोलवार्ड्टने 26 चेंडूत 28 धावा केल्या. त्यानंतर फोईबने 35 आणि गार्डनरने 30 धावा केल्या. हातात विकेट असूनही जोरदार फटकेबाजी करण्यात गुजरातच्या फलंदाजांना अपयश आलं. दुसरीकडे, युपी वॉरियर्सने पहिल्या षटकापासूनच आक्रमक रुप धारण केलं होतं.
एलिसा हिली आणि किरण नवगिरे या जोडीने पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. पण नवगिरे मागच्या सामन्याप्रमाणे काही खास करू शकली नाही. 12 धावा करून किरण नवगिरे तनुजा कन्वारच्या गोलंदाजीवर तंबूत परतली. त्यानंतर चमारी अट्टापट्टूही 17 धावा करून माघारी परतील. त्यानंतर मोर्चा सांभाळला तो ग्रेस हॅरिसने आणि 33 चेंडूत 60 धावा ठोकल्या. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. संघाला विजय मिळवून देईपर्यंत हॅरिस मैदानात राहिली.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): हरलीन देओल, बेथ मूनी (कर्णधार/विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, लॉरा वोल्वार्ड, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मन्नत कश्यप, मेघना सिंग.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड.