WPL 2024, UPW vs RCB : स्मृती मंधानाचा आक्रमक अर्धशतकी खेळी, युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांना धू धू धुतलं

| Updated on: Mar 04, 2024 | 8:52 PM

स्मृती मंधाना हीने युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आता प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. याची जाणीव कर्णधार स्मृती मंधाना हीला आहे. त्यामुळेच आक्रमक शैलीने तिने झटपट धावा केल्या.

WPL 2024, UPW vs RCB : स्मृती मंधानाचा आक्रमक अर्धशतकी खेळी, युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांना धू धू धुतलं
Follow us on

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 11 व्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर बंगळुरुला फलंदाजीचं निमंत्रण मिळालं. धावांचा डोंगर रचल्याशिवाय विजय सोपा नाही याची जाणीव कर्णधार स्मृती मंधानाला होती. त्यामुळे तिने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 34 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजांना फटकवण्याचा क्रम सुरुच ठेवला. चौकार आणि षटकारांची आतषबाजीने बंगळुरुचं स्टेडियम दणाणून निघालं. एका बाजूला स्मृती मंधाना आक्रमकपणे खेळत होती. दुसऱ्या बाजूला तिला एलिस पेरीची चांगली साथ मिळाली. त्यामुळे स्कोअरबोर्डवर धावा झटपट लागत होत्या. दुसऱ्या डावात दव फॅक्टर पाहता गोलंदाजी करणं कठीण जातं याची जाणीव कर्णधार स्मृती मंधाना हीला होती.

स्मृती मंधाना हीने 50 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. तर दुसऱ्या विकेटसाठी एलिस पेरीसोबत 95 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधानाच्या आक्रमक शैलीमुळे युपी वॉरियर्सचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. तिला बाद करण्यात दीप्ती शर्माला यश आलं. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर पूनम खेमनारने तिचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवाला. तिथपर्यंत तिने आपली खेळी करून गेली होती.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी