मुंबई : भारताच्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी कुस्तीपटू नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला भारतीय क्रिकेटपटूंनी पाठिंबा दर्शवत नसल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगाटनं नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता या आंदोलनाबाबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका कार्यक्रमात सौरव गांगुली यांना कुस्तीपटूंच्या संपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर देताना सौरव गांगुली यांची त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. कुस्तीपटुंना त्यांची लढाई स्वतःच लढू द्या, असं गांगुली यांनी म्हटलं आहे.
सौरव गांगुली म्हणाले, त्यांची लढाई त्यांना लढू द्या. तिथे काय चालले आहे त्याबाबत मला माहिती नाही. मी फक्त बातम्यांमध्ये वाचलं आणि ऐकलं आहे. ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तर त्याबद्दल बोलू नये. मला आशा आहे की यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असं गांगुली यांनी सांगितलं.
#WATCH | “…Let them fight their battle. I really don’t know what’s happening there, I just read in the newspapers. I realised one thing in the sports world, that you don’t talk about things which you don’t have complete knowledge of. I hope it gets resolved. Wrestlers bring a… pic.twitter.com/eRYABRBCL9
— ANI (@ANI) May 5, 2023
विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूं जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. तसंच आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई केली आहे.
दरम्यान, 5 मे 2023 रोजी लखनऊमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, जंतर मंतरवर संपावर बसलेल्या कुस्तीपटूंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता त्यांनी दिल्ली पोलिसांना पूर्ण तपास करण्याची परवानगी द्यावी. अनुराग ठाकूर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी सर्व आंदोलक कुस्तीपटूंना विनंती करतो की त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. न्यायालयानेही निर्देश दिले आहेत, त्यामुळे त्यांनी निष्पक्ष तपास पूर्ण होऊ द्यावा. दिल्ली पोलीस दूध का दूध और पाणी का पाणी करेल आणि गुन्हेगारावर कडक कारवाई करेल.