मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी मालिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. प्रत्येक कसोटी सामना अंतिम फेरीच्या दिशेने महत्त्वाचा आहे. मालिका जिंकण्यासोबत विजयी टक्केवारी चांगली राखणंही तितकंच महत्वाचं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत एकूण 9 संघ असून टॉपच्या दोन संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होते. पहिल्या पर्वात न्यूझीलंड आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. दोन्ही वेळेस भारताच्या पदरी निराशाच पडल्याचं दिसून आलं आहे. तिसऱ्या पर्वात चांगल्या कामगिरीची भारताकडून अपेक्षा आहे. मात्र सुरुवातीपासून गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. आयसीसीच्या नव्या नियमाचा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला फटका बसला आहे. यावरून ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याने आयसीसीवर टीका केली आहे.
उस्मान ख्वाजाने चौथ्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी संघाला दंड ठोठवल्याप्रकरणी कानउघडणी केली आहे. स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीत 10 गुण कापण्यात आले आहेत. दुसऱ्या डावात गोलंदाजीची संधीच मिळाली नसताना गुण कोणत्या आधारावर कापले असा सवाल त्याने आयसीसीला विचारला आहे.
Don't even get the chance to bowl in the second innings at Manchester due to 2 days of rain and @ICC still issue fines and take 10 WTC points of us for slow over rates! That makes a lot of sense… ??♂️ pic.twitter.com/NKuGI61n2n
— Usman Khawaja (@Uz_Khawaja) August 2, 2023
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत इंग्लंडला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. पाच पैकी चार सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीतून 19 गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे इंग्लंड पाचव्या स्थानावर तर वेस्ट इंडिजची वर्णी चौथ्या स्थानी लागली आहे.
England and Australia were hit with heavy sanctions for slow over-rates in the Ashes.
Ricky Ponting and Nasser Hussain presented solutions for the dilemma in the #TheICCReview.https://t.co/myvp49mz8l
— ICC (@ICC) August 2, 2023
आयसीसीने सांगितलं की, “नव्या नियमानुसार निर्धारित वेळेत प्रत्येक ओव्हर न टाकल्याने मॅच फीसमधून पाच टक्के दंड आणि एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिन गुण कापला जाणार आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटी दोन षटकं , दुसऱ्या कसोटीत नऊ षटकं, चौथ्या कसोटीत तीन आणि पाचव्या कसोटीत पाच षटकं कमी टाकली.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणांसह विजयी टक्केवारी महत्त्वाची आहे. स्लो ओव्हर रेटमुळे विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हे गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक संघाला वेळेचं पालन करावं लागणार आहे.