वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघांमध्ये चढाओढ दिसत आहे. पाकिस्तान बांगलादेश सामन्यानंतर या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. दोन सामन्यांची कसोटी बांगलादेशने 2-0 ने जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. यासह पाकिस्तानचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावरून थेट आठव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईटवॉश देत गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर होता. तसेच विजयी टक्केवारी 35 होती. पण पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताच बांगलादेशने मोठी झेप घेतली आहे. थेट सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही आता 45.83 झाली आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडपेक्षा वरचढ ठरला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 19.05 इतकी आहे. यापूर्वी ही टक्केवारी 22.22 इतकी होती.
दुसरीकडे, भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.52 इतकी आहे. त्यामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आता उर्वरित दहा कसोटी सामन्यापैकी सात सामने जिंकले भारताचं अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. याच महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्याने ही मालिका वाटते तितकी सोपी नसेल हे देखील तितकंच खरं आहे.
ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी असून दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 6 पैकी 3 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 50 इतकी असून तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडने 15 कसोटी सामने खेळले असून त्यात 8 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी 45 इतकी असून पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने 6 पैकी 2 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. विजयी टक्केवारी ही 38.89 इतकी असून सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेने 6 पैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी असून सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने 9 पैकी एका सामन्यात विजय, सहा सामन्यात पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 18.52 इतकी असून नवव्या स्थानावर आहे..