WTC Final 2023 AUS vs IND | टीम इंडिया 296 धावांवर ऑलआऊट, रहाणे-ठाकुर जोडीची झुंज

| Updated on: Jun 09, 2023 | 7:42 PM

Wtc Final 2023 AUS vs IND | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 296 धावांवर ऑलआऊट केलं आहे. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या जोडीने टीम इंडियासाठ संकटमोचकाची भूमिका बजावली.

WTC Final 2023 AUS vs IND | टीम इंडिया 296 धावांवर ऑलआऊट, रहाणे-ठाकुर जोडीची झुंज
Follow us on

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये ऑलआऊट झाली आहे. टीम इंडियाने 69.4 ओव्हरमध्ये 296 धावा केल्या आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक 89, शार्दुल ठाकुर याने 51 आणि रविंद्र जडेजा याने 48 धावांचं योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या युवा आणि अनुभवी फलंदाजांनी हिरमोड केला. हे चौघेही झटपट आऊट झाले. रोहित शर्मा 15 धावांवर आऊट झाला. तर त्यापाठोपाठ शुबमन गिल याने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आयपीएलमध्ये हिरो ठरलेल्या शुबमनने घोर निराशा केली.

हे सुद्धा वाचा

सलामी जोडी झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया आता अडचणीत सापडली. सलामी जोडी आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 बाद 30 अशी स्थिती झाली. तर दुसऱ्या सत्रातील खेळ संपला तोवर भारताने 10 ओव्हरमध्ये 2 बाद 37 धावा केल्या. तिसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडीकडून अपेक्षा होत्या. मात्र या दोघांनीही निराशा केली. पुजारा आणि विराट दोघेही प्रत्येकी 14 धावा करुन माघारी परतले.

त्यानंतर रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 100 बॉलमध्ये 71 रन्सची पार्टनरशीप केली. या 71 धावांच्या भागीदारीत जडेजा याने 48 तर रहाणे याने 15 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर जडेजा 48 धावांवर आऊट झाला. त्यानंतर केएस भरत मैदानात आला. केएस आणि रहाणे दुसऱ्या दिवशी नाबाद परतले. मात्र तिसऱ्याच दिवशी मैदानात येताच दुसऱ्या बॉलवर केएस आऊट झाला.

शार्दुल-रहाणे जोडीने सावरलं

केएसनंतर शार्दुल मैदानात आला. शार्दुलने याआधीही ओव्हलवर अर्धशतक ठोकलंय. त्यामुळे शार्दुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. शार्दुलने निराशा केली नाही. शार्दुलने रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. रहाणेने 129 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 89 धावांची खेळी केली.

टीम इंडिया ऑलआऊट

रहाणे आऊट झाल्यानंतर ठाकुरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. ठाकुरने काही फटके मारुन आपलं चौथं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर उमेश यादव आऊट 5 धावांवर आऊट झाला. अर्धशतक केल्यानंतर शार्दुल ठाकुरच्या शानदार खेळीचा द एन्ड झाला. शार्दुलने 109 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलनंतर शमी 13 धावांवर आऊट झाला आणि टीम इंडिया ऑलआऊट झाली.

ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग केलेल्या पाचच्या पाच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. बोलँड, मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नेथन लायन याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.