मुंबई | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 234 धावांवर बाजार उठला. टीम इंडियाचा 209 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. सोबतच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्मा नक्की काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात.
रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायलनमधील पराभवानंतर आगामी एकदिवसीय वनडे वर्ल्ड कप 2023 बाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने या वनडे वर्ल्ड कपसाठी रणनिती निश्चित करावी लागेल, असं म्हटलंय.
“ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करु. आम्ही सहकाऱ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ. तसेच आम्हाला हा सामना जिंकायचाय असं अजिबात विचार करणार नाही. हा सामना महत्वाचा आहे, ही स्पर्धा महत्वाची आहे असं आम्ही विचार करतो. यामुळे अनुकूल निकाल लागत नाहीय”, असं रोहित म्हणाला.
“तसेच आता आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि रणनिती आखावी लागेल. आता आमचं लक्ष काही वेगळं करण्यावर असायला हवं. तसेच आम्ही खेळाडूंना बिंधास्तपणे खेळायला सांगितलं. हा स्पष्ट मेसेज आहे. टेस्ट असो टी 20 असो किंवा वनडे. आम्हाला दबावात खेळायचं नाहीये.”, असं रोहितने स्पष्ट केलं.
“जर तुम्ही पाहिलं असेल तर मी आणि शुबमन गिल याने दुसऱ्या डावात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आम्ही पहिल्या 10 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या. अशा पद्धतीने खेळल्यास आऊट होण्याचाही धोका असतो”, असंही रोहितने नमूद केलं.
“लोकं म्हणतात की तुमची एकाग्रता भंग झाली, असं नाहीये. विषय इतकाचे की आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळू इच्छितो. आम्ही बरेच आयसीसी स्पर्धा खेळलो पण जिंकलो नाहीत. आमचा प्रयत्न काही वेगळं करण्याचं आहे”, असं रोहितने म्हटलं.