लंडन | क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 16 व्या मोसमानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 चे वेध लागले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅमपियनशीप फायनल महामुकाब्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. हा हायव्होल्टेज सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. मात्र त्याआधी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
लंडनमधील द ओव्हल इथे पावसाचं सावट आहे. वर्ल्ड वेदर ऑनलाईननुसार, 7 ते 11 जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामन्यातील पहिले 3 दिवस साधारण पावसाचा अंदाज आहे. तर 10 आणि 11 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे महाअंतिम सामन्याचा सत्यानाश झाला, तर टेस्ट वर्ल्ड क्रिकेटचा किंग कोण होईल, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
पावसामुळे सामना निकाली न निघाल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येईल. आयसीसीने खबरदारी म्हणून 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या महत्वाचा सामना ड्रॉ किंवा टाय झाल्यास दोन्ही संघ विजेते ठरतील, असं आयसीसीने आधीच जाहीर केलं आहे. तसेच बक्षिसाची रक्कमही दोन्ही संघामध्ये बरोबर वाटली जाईल. टेस्ट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 13 कोटी तर उपविजेत्याला साडे सहा कोटी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तर सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी समसमान साडे सहा कोटी रुपये देण्यात येतील.
दरम्यान टीम इंडियात एक बदल झाला आहे. ऋतुराज गायकवाड हा त्याच्या लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी लंडला रवाना होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.