मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम फेरीचा सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला किती कोटी रुपये मिळतील याबाबतची घोषणा आयसीसीने केली आहे. नऊ संघांमध्ये 31 कोटी रुपये वाटले जाणार आहे. 2021-23 दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खेळलेल्या संघांचा यात सहभाग असणार आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 दरम्यान असलेली बक्षिसाची रक्कम कायम ठेवली आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती रुपये मिळतील ते..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या संघाला 13 कोटींची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर संघांनाही पैसे मिळणार आहेत. उपविजेत्या संघाला साडे सहा कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला 3 कोटी 70 लाख, चौथ्या क्रमांकावरील इंग्लंड संघाला 2.89 कोटी, पाचव्या क्रमांकावरील श्रीलंकन संघाला 1.65 कोटी रुपये मिळतील.
सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला, सातव्या क्रमांकावरील पाकिस्तान संघाला, आठव्या क्रमांकावरील वेस्ट इंडिज संघाला आणि नवव्या क्रमांकावरील बांगलादेश संघाला प्रत्ये 82 लाख रुपये मिळणार आहेत.
दोन वर्ष कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत करत आपलं स्थान अंतिम फेरीत निश्चित केलं आहे. अंतिम फेरीचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. हा सामना 7 जून 2023 ते 11 जून 2023 दरम्यान असेल. तसेच एक दिवस राखून ठेवला आहे.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भारत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
भारताचे स्टँडबाय प्लेयर्स : ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार
ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.