मुंबई : टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जून महिन्यामध्ये 7 ते 11 यादरम्यान फायनल सामना होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघातील मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होता मात्र त्याच्यावर आता शस्त्रक्रिया होणार असल्याने तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे. इतकंच नाहीतर आयपीएलमधूनही हा खेळाडू बाहेर झाला आहे.
आयपीएलमध्ये केकेआर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा श्रेअस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 चा हंगाम आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. अय्यर शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार असून रिकव्हर व्हायला त्याला तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. आताच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याला मालिकेतून बाहेर पडाव लागलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये तो परतला होता खरा पण त्याला फारशी काही चमक दाखवता आली नव्हती. यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही वगळण्यात आलं होतं. भारत आणि बांगलादेश डिसेंबर 2022 दौऱ्यावेळी त्याला दुखापत झाली होती.
आयपीएलमध्ये केकेआर संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी असणाऱ्या अय्यरला आपल्या दुखपतीमुळे बाहेर जावं लागलं आहे. याआधीही त्याच्याकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद असताना त्याला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये प्रत्येक संघाचे खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकल्याचं दिसत आहे.
दरम्यान, श्रेअसने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करताना शतक झळकवलं होतं. त्यानंतर त्याने मधल्या फळीमध्ये फलंदाजीला येत संघासाठी खोऱ्याने धाव काढल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर अय्यरने आपलं कसोटी संघातील स्थान भक्कम केलं होतं. मात्र दुखापतीमुळे तो आयपीएल आणि WTC फायनल सामन्याला मुकणार आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलमध्ये संघ कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.