मुंबई : टीम इंडियाचं 10 वर्षांपासूनचं आयसीसी टूर्नामेंट जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा संघाचे अधुरेच राहिलं आहे. आता T20 वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप या चारही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा संघ पहिला संघ बनला आहे. टीम इंडियाने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत संघाने 9 आयसीसी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. 4 फायनल आणि 4 सेमीफायनलमध्ये पराभव झाला आहे.
T20 वर्ल्ड कपध्ये 2014 च्या फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडियाने 130 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. 2016 सालाबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता.
2021 ला UAE मध्ये खेळला गेला. येथील संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. संघ दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडला. T20 वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाचा 10 गडी राखून पराभव झाला. 2022 च्या T20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये 2015 साली फायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाली. टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. येथे त्यांचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ 233 धावा करता आल्या. तसेच न्यूझीलंडने 2019 मध्ये न्यूझीलंडनेच सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव करून त्यांचे स्वप्न भंगले. फखर जमानच्या 114 धावांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 158 धावांवर गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सुरूवातीच्या फलंदाजीला सुरुं लावला होता.
आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ पहिल्या सत्रात गुणतालिकेत अव्वल होता. पण 2021 मध्ये इंग्लंडमधील साउथहॅम्प्टनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तो न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. आता इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्याला कांगारू संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे.