दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया डी संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या सामन्यात इंडिया ए आणि इंडिया डी हे संघ आमनेसामने आले होते. दो्न्ही संघांना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय महत्त्वाचा होता. पण यात इंडिया ए संघाने बाजी मारली. इंडिया डी संघाला 186 धावांनी पराभूत करत जेतेपदाच्या शर्यतीत उतरला आहे. इंडिया ए संघाने दुसऱ्या डावात 488 धावांचं आव्हान इंडिया डी संघासमोर ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंडिया डी संघाने सावध सुरुवात केली. फक्त एक विकेट गमवून फलकावर 102 धावा लावल्या होत्या. पण शम्स मुलानी टाकत असलेल्या 30व्या षटकात गडबड झाली. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यश दुबे विचित्र पद्धतीने धावचीत झाला. हा रनआऊट पाहून उपस्थित क्रीडाप्रेमींना धक्का बसला. झालं असं की, यश दुबे 37 धावांवर खेळत होता. तसेच नॉन स्ट्राईकला उभा होता आणि तेव्हाच हा विचित्र प्रकार घडला.
शम्स मुलानीच्या षटकातील चौथा चेंडूचा सामना करण्यासाठी समोर रिकी भुई उभा होता.त्याने एक धाव घेण्याच्या हेतून सरळ फटका मारला. त्यानंतर नॉन स्ट्राईकला उभा असलेला यश दुबे धाव घेण्यासाठी सरसावला. पण असं करत असताना शेवटच्या क्षणाला चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि चेंडूची दिशा बदलली. यश दुबेच्या बॅटला चेंडू लागून विकेटच्या दिशेने चालला होता. तेव्हा शम्स मुलानीने तत्परता दाखवली आणि त्याला धावचीत केलं. अशा विचित्र बाद झाल्याने मोठी भागीदारी मो़डीत निघाली.
Some quick thinking, presence of mind & luck helped India A break the 100-run stand between Yash Dubey & Ricky Bhui 🙌#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️: https://t.co/m9YW0HttaH pic.twitter.com/w6nBmgPxfB
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2024
दुसऱ्या डावात दुसऱ्या विकेटसाठी यश दुबे आणि रिकी भुई यांच्यात 102 धावांची भागीदारी झाली होती. पण यश दुबेचा डाव 37 धावांवर आटोपला. तर रिकी भुई 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांकडून अपेक्षा होती. पण देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांना शम्स मुलानीने त्रिफळाचीत केलं. दरम्यान रिकी भुईने 195 चेंडूत 113 धावांची खेळी केली. यात 14 चौकार आणि 3 षटकार मारले.