मुंबई | टीम इंडिया 7 मार्चपासून धर्मशाला येथे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाचव्या आणि कसोटी सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवा सामना जिंकून टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पाँइंट्स टेबलमधील अव्वल स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विजयाने भारत दौऱ्याची सांगता करण्याच्या तयारीत आहे. अशात या सामन्याआधी आयसीसीकडून टीम इंडियाच्या युवा खेळाडूला बहुमान दिला आहे.
आयसीसीने टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला ‘मेन्स क्रिकेट प्लेअर ऑफ द मंथ फेब्रुवारी’ या पुरस्कारसाठी नामांकन दिलं आहे. आयसीसीने यशस्वीसह न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियमसन आणि श्रीलंका टीमचा पाथुम निसांका या दोघांना नामांकन दिलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आता या तिघांपैकी कुणाला आयसीसीचा पुरस्कार मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.
आयसीसी एका महिन्यात सर्वोत्तम कामिगरी करणाऱ्या खेळाडूंना नामाकंन देतं. त्यानुसार आयसीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी यशस्वी, पाथुम आणि केन या तिघांची निवड केली आहे. या तिघांनी फेब्रुवारीत आपल्या टीमसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. आता तिघांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत फेब्रुवारी महिन्यात सलग 2 द्विशतकं झळकावली. यशस्वीने या द्विशतकांसह टीम इंडियाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. तर केन विलियमसन याने फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी केली. न्यूझीलंडने या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 281 धावांनी विजय मिळवला. तर पाथुम निसांका याने 9 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 210 धावांची द्विशतकी खेळी करत इतिहास रचला. पाथुमच्या या कामगिरीसाठी त्यालाही नामांकन देण्यात आलं आहे.
तिघांपैकी कोण ठरणार ‘यशस्वी’?
Revealing the ICC Men’s Player of the Month shortlist for February 2024.
— ICC (@ICC) March 4, 2024
आयसीसी दर महिन्यातील कामगिरीच्या आधारावर 3 सर्वोत्तम खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन देतं. त्यानंतर क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला व्होट देऊ शकतात. आयसीसी सर्वाधिक लोकपसंती मिळालेल्या खेळाडूला पुरस्कार जाहीर करते.