मुंबई : यशस्वी जयस्वाल याचं कसोटी संघात खेळण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यातच यशस्वी जयस्वाल याने चमकदार कामगिरी केली. पहिल्याच कसोटी सामन्यात यशस्वीने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. झुंजार अर्धशतकी खेळी करत भविष्यातील क्रिकेटची छाप सोडली आहे. रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी देखील केली. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरी पाहून यशस्वी जयस्वालची संघात निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजच्या खेळपट्टीवर तग धरणाऱ्या 21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याचा आयपीएल स्पर्धेत हिरमोड झाला होता. त्यामुळे त्याला अश्रू अनावर झाले होते.
प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी यशस्वी जयस्वाल बाबत सांगितलं की “अंडर 19 वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली. मात्र आयपीएल 2020 स्पर्धेत अपयशी ठरला. तीन सामन्यात फक्त 40 धावा केल्या होत्या. यामुळे तो खचला होता. यशस्वीने फोन करत सांगितलं होतं की सर मी माझी पहिली आयपीएल स्पर्धा हातून गमावली आहे. मी काहीच करू शकलो नाही. येथूनच त्याचं नशिब बदललं.”
यशस्वी जयस्वाल याने जेव्हा प्रशिक्षकांना असं सांगितलं तेव्हा ते गोरखपूरला होते. कोरोना स्थितीमुळे त्यांनी तिथे राहण्याचा निर्णय घेतला होता. ज्वाला सिंह यांनी त्याचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्याला गोरखपूरला येण्याचा सल्ला दिला. “तू पण येथे ये, आपण शून्यातून सुरुवात करू. मला इथे सिमेंट विकेट मिळाली आहे. मी गोलंदाजांना सांगितलं की जितक्या वेगाने टाकता येईल तितकं टाका. तेव्हा त्याने या सरावामुळे माझी रेड बॉल क्रिकेट खराब होईल.”
ज्वाला सिंह यांनी पुढे सांगितलं की, “मी त्याला समजवताना सांगितलं की, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर मोठं काहीतरी करावं लागेल. वेग आणि बाउंससोबत अभ्यास करावा लागेल. यशस्वीला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पण हळूहळू चांगलं करत गेला”
यशस्वी जयस्वाल याने मुश्ताक अली ट्रॉफीतील एका सामन्यात 52 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने आपला खेळ काही वेगळाच केला. 2021 मध्ये स्ट्राइक रेट 148 झाला. आयपीएलच्या तीन सीझननंतर त्याला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि कोच कुमार संगकारा याची साथ मिळाली. आयपीएल 2023 मध्ये त्याने 164 च्या सरासरीने 625 धावा केल्या.