कर्नल सीके नायडू ट्रॉफीत मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुंबई विरुद्ध हरियाणा सामन्यात रेकॉर्डब्रेक कामगिरी झाली आहे. हा सामना गुरुग्राम क्रिकेट ग्राउंड, सुल्तानपूर येथे खेळत आहेत.या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यशवर्धन दलाल नावाचं वादळ शमवताना मुंबईच्या नाकी नऊ आले. कारण यशवर्धनने 46 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 426 धावा केल्या. या खेळीसह यशवर्धन दलालने इतिहास रचला आहे. हरियाणाने दुसऱ्या दिवशी 8 गडी गमवून 732 धावा केल्या. या सामन्यात यशवर्धनने ओपनिंग करताना दुसऱ्या दिवसापर्यंत 463 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 426 दावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 92.01 इतका होता. नाबाद 426 खेळीसह या स्पर्धेच्या इतिहासातील एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला, त्याने उत्तर प्रदेशच्या समीर रिझवीचा विक्रम मोडला. त्याने स्पर्धेच्या मागील पर्वात 312 धावा केल्या होत्या.
यशवर्धनने या सामन्यात 451 चेंडूत 400 धावा पूर्ण केल्या. तेव्हा त्याने 10 षटकार आणि 44 चौकार मारले होते. इतकंच काय तर यशवर्धनने अर्श रंगासोबत 410 धावांनी मोठी भागीदारीही केली. या भागीदारीत अर्श रंगाने 131 चेंडूंचा सामना केला आणि 18 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 151 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईचा संघ बॅकफूटवर गेला आहे. हरियाणाच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हरियाणाने 8 गडी गमवून 732 धावा केल्या आहेत. यशवर्धन आणि अर्शच्या खेळीसोबत इतर खेळाडूंनीही आपलं योगदान दिलं. कर्णधार सर्वेश रोहिल्ला 59 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. तर पर्थ वत्सने 24, पर्थ नागिल्लने 5 धावा केल्या. मुंबईकडून अथर्व भोसलेने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याने 58 षटकं टाकत 135 धावा दिल्या.
यशवर्धन दलालची ही खेळी आयपीएल लिलावाच्या बरोबर आधी झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचा नजरा असणार आहे. कारण यशवर्धनची बेस प्राईस ही जास्तीत जास्त 30 लाख रुपये आहे. त्यामुळे या नवोदित खेळाडूला संघात घेण्यासाठी चढाओढ असेल. कारण फॉर्मही फ्रेंचायझीसाठी खूपच महत्त्वाचा ठरतो.