मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. त्यामुळे आता टीम इंडियाचं लक्ष्य टी-20 वर्ल्ड कप 2024 वर असणार आहे. वन डे वर्ल्ड कपमधील फायनल गमावल्यावर टीम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान असणार आहे. टी-20 मध्ये आतार्यंत अनेक कॅप्टन बदलेले, जवळपास 9 खेळाडूंनी कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. हार्दिक पंड्या भारतासाठी पहिली पसंती मानला जात आहे. आता त्याच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेमध्ये सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची धुरा दिली आहे. आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की, येत्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाणार? यावर वर्ल्ड कप विजेत्या संघाचा माजी खेळाडू झहीर खान याने आपलं मत मांडलं आहे.
टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला फारसा वेळ राहिला नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात जास्त अनुभव असलेल्या खेळाडूला संधी दिली पाहिजे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माकडे कॅप्टन्सी दिली तर फार काही आश्चर्य वाटणार नाही. कारण रोहितला दबावाच्या परिस्थितीत सामना कसा पुढे न्यायचा हे चांगलं माहित आहे, असं झहीर खान म्हणाला.
रोहितसोबत इतर जे खेळाडू आहेत त्यांना भविष्यातही कर्णधारपदासाठी संधी दिली जावू शकते. मात्र येत्या वर्ल्ड कपमध्ये रोहितकडेच संघाचं कर्णधारपद असावं असं मला वाटत असल्याचं झहीर खान याने म्हटलं आहे. रोहितकडे आयपीएलचाही तगडा अनुभव असून त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. रोहितचा हा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, रोहित शर्मा 32, हार्दिक पंड्या 16, विराट कोहली 10, ऋषभ पंत पाच, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड प्रत्येकी तीन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव प्रत्येकी दोन आणि केएल राहुलने एका सामन्यात या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.