विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने झिंबाब्वेला पाचव्या आणि शेवटच्या टी 20I सामन्यात विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर रियान पराग आणि शिवम दुबे या दोघांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.
झिंबाब्वेने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप पाहता झिंबाब्वेने रोखलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण तोडीसतोड फलंदाज असूनही संजूचा अपवाद वगळता इतरांना मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन याने 45 बॉलमध्ये 4 षटकार आणि 1 चौकारासह 128.89 च्या स्ट्राईक रेटने 58 धावांची खेळी केली. संजूला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. ब्लेसिंग मुझाराबानी याने संजूला आऊट केलं.
टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने अनुक्रमे 12 आणि 13 अशा धावा केल्या. अभिषेक शर्मा 14 धावा करुन माघारी परतला. रियान पराग आणि शिवम दुबे या दोघांनी मिडल ऑर्डरची जबाबदारी सांभाळली. शिवम दुबेने 12 चेंडूत 2 चौकार आणि तितक्याच षटाकारंच्या मदतीने 26 धावा ठोकल्या. शिवमला सूर गवसलेला. मात्र रिंकू सिंहसोबत झालेल्या गडबडीमुळे शिवम नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. तसेच पराग याने 22 धावांचं योगदान दिलं. तर रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे नाबाद परतले. रिंकूने 11 तर सुंदरने 1 धाव केली. झिंबाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी याने 2 विकेट्स घेतल्या. तर सिकंदर रझा, ब्रँडन मावुता आणि रिचर्ड नगारावा या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.