लखनऊ : टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने हायव्होल्टेज राडा केला. पत्नी हसीन जहांने शमीच्या घरी जाऊन राडेबाजी केली. हसीन जहां रविवारी रात्री सहसपूर अलीनगर इथे आली. त्यानंतर ती शमीच्या घरी गेली आणि एका खोलीत जाऊन बसली. शमीच्या नातेवाईकांनी तिला घरातून बाहेर काढलं. त्यावेळी हसीन जहां आणि शमी कुटुंबियांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तपास करुन, हसीन जहां आणि अन्य दोघांना अटक केलं. आज तिला कोर्टात हजर करण्यात येत आहे.
हसीन जहां रविवारी अचानक शमीच्या गावी दाखल होत, त्याच्या घरात आली. शमीच्या नातेवाईकांनी तिला घरात घुसण्यास विरोध केला. मात्र तरीही घरात घुसण्यात ती यशस्वी ठरली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शमीच्या पत्नीला ताब्यात घेतलं.
हसीन जहांचे आरोप
दरम्यान, हसीन जहांने पोलिसांवरच आरोप केले आहेत. मोहम्मद शमीचे बड्या हस्तींसोबत संपर्क आहे, शिवाय पैशामुळे उत्तर प्रदेश पोलीस आपल्याला त्रास देत आहे, असं हसीनने म्हटलं.
मी सुद्धा एक मुलगी आहे, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ हे सरकारचं धोरण आहे. योगी आदित्यनाथ सरकार, मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप हसीनने केला.
मला रात्रीचं 12 वाजता धक्के मारत पोलिसांनी ताब्यात घेतलं. माझा फोन हिसकावला, मला दुखापत केली असं तिने म्हटलं.
मोहम्मद शमी आयपीएलमध्ये
दरम्यान मोहम्मद शमी सध्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून मैदानात आहे. आयपीएलमधील शमीचा सध्याचा फॉर्म तितकासा चांगला नसला, तरी त्याच्या धारदार गोलंदाजीमुळे शमीची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
शमी आणि पत्नीचा वाद
मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहां यांच्यात मार्च 2018 पासून वादावादी सुरु आहे. हसीन जहां ने शमीच्या कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा वाद कोर्टात आहे. या वादामुळे बीसीसीआयने शमीचं नाव कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटवलं होतं. मात्र नंतर बीसीसीआयच्या चौकशी समितीने त्याला क्लीन चीट दिली.