लंडन : एजबॅस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात करत इंग्लंडने विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना इंग्लंडने 2 बाद 226 धावा केल्या. फायनलमध्ये 14 जुलैला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतावर मात करत न्यूझीलंडने फायनलमध्ये धडक दिली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणत इंग्लंडने दुसरा सेमीफायनल जिंकला आणि 27 वर्षांनी सेमीफायनलमध्ये धडक दिली.
इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची सर्वबाद 223 अशी दाणादाण उडाली होती. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी सुरु केली. जेसन रॉय 85 आणि जॉनी बेअरस्टो 37 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (नाबाद 45) आणि ज्यो रुट (नाबाद 49) यांनी फायनलच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी इंग्लंडकडून ख्रिस वोक्स 3, आदिल राशिद 3, जोफ्रा आर्चर 2 आणि मार्क वूडनेही एका फलंदाजाला माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर स्टीव्ह स्मिथने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो 85 धावांवर धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या आशा मावळल्या. पण त्यानंतर एलेक्स कॅरीने 46 धावांची खेळी करत धावसंख्या 223 पर्यंत नेण्यास मदत केली.
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज संपूर्ण विश्वचषकात फॉर्मात दिसत होते. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत गोलंदाजांवरच दबाव टाकण्यात यश मिळवलं. इंग्लंडने अजून एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही, तर दुसरीकडे न्यूझीलंडनेही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी भिडणार आहेत. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात ऐतिहासिक अंतिम सामना रंगणार आहे.
यजमान संघ विजयाची हॅट्ट्रिक करणार?
इंग्लंडने हा विश्वचषक जिंकण्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची ही सलग तिसरी वेळ असेल. कारण, 1975 ते 2007 या काळात एकाही यजमान संघाने विश्वचषक जिंकलेला नाही. पण 2011 साली भारताने आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. इंग्लंडने फायनलमध्ये विजय मिळवल्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची हॅट्ट्रिक होईल.