नवी दिल्ली : विराट कोहली (Virat Kohli) केवळ त्याच्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत नाही, तर तो मैदानाबाहेरही असे काही करतो ज्याची हेडलाइन बनते. विराट कोहलीने पुन्हा एकदा असेच काहीसे केले आहे. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत (dance with Anushka Sharma) डान्स केला, मात्र तो त्यालाच फार महागत पडला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ (video) पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती विराटसोबत डान्स करत आहे. मात्र, डान्स करताना विराट अचानक जोरात किंचाळला अन् ते पाहून अनुष्काला हसू अनावर झालं.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती विराटसोबत जिममध्ये डान्स करत आहे. बॅकग्राऊंडला एक पंजाबी गाणंही वाजत आहे. दोघेही मजेत डान्स करत होते, मात्र त्याचवेळी असं काही झालं की विराट अचानक जोरात ओरडला आणि त्याने डान्स थांबवला. खरंतर अनुष्काचा पाय त्याच्या हातावर आपटल्याने त्याला लागलं आणि म्हणूनच विराट थोडा ओरडला. पण ते पाहून अनुष्काला तिचं हसू आवरेनासं झालं. कदाचित ही एक मजाच होती. पण विराटच्या चाहत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
विराटच्या फॅन्सचा अनुष्काला सल्ला
विराट कोहलीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याची पत्नी अनुष्का शर्माला सल्ला दिला. विराट कोहलीच्या दुखण्याने चाहते घाबरले होते. अनेकांनी कॉमेंट्स करून अनुष्काला असा व्हिडीओ न बनवण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएलच्या अजून खूप मॅचेस बाकी आहेत, आणि या स्पर्धेनंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे.त्यामुळे विराटला कुठलीही दुखापत होऊ नये, याच हेतूने चाहत्यांनी अनुष्काला जपून वागण्याचा सल्ला दिला आहे.
विराट जरा सांभाळून रे बाबा, कुठं लागायला नको
खरंतर, विराट कोहलीने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे कारण टीम इंडियाला त्याच दुखापतीचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांचे अनेक मोठे खेळाडू जखमी झाले आहेत. T20 विश्वचषकापूर्वी रवींद्र जडेजालाही मजा करताना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो स्पर्धेतूनच बाहेर पडला होता. आता विराटला काही झालं तर टीम इंडिया हा धक्का सहन करू शकणार नाही.
तसं पहायला गेलं तर विराट कोहलीची बॅटिंग रंगात आली आहे. तो आशिया चषक 2022 पासून सतत धावा करत आहे. या आयपीएल मोसमातही विराट कोहलीने 7 सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने या मोसमात 7 सामन्यात 46.50 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 140 पेक्षा जास्त आहे. आता एवढा चांगला फॉर्म असूनही विराटला दुखापत झाली तर कदाचित या खेळाडूला इतरांपेक्षा जास्त त्रास होईल.