मुंबई : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. देशात गल्लोगल्ली क्रिकेट खेळताना मुलं दिसतात. यापैकी काही जणांचं टीम इंडियात स्वप्न असतं. यासाठी दिवसरात्र मेहनत केली जाते. पण टीम इंडियात प्रत्येकाला स्थान मिळेल असं नाही. मिळालं तर प्लेईंग 11 मध्ये खेळणं कठीण होऊन जातं. इतक्या चांगल्या दर्जाचे खेळाडू असल्याने एखादा खेळाडू जखमी झाला की त्याची जागा घेण्यासाठी दुसरा खेळाडू तयारच असतो.त्यात हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू असला की प्रश्नच येत नाही. हार्दिक क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. इतकंच काय तर त्याच्याकडे टी 20 संघाचं कर्णधारपद देखील सोपवण्यात आलं आहे. हार्दिक पांड्यानं आपल्या फलंदाजीनं क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. तर गोलंदाजीत तो चांगल्या प्रकारे स्विंगदेखील करतो. मात्र क्रिकेट खेळताना त्याला एका वाईट काळातून जावं लागलं. पाठिच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं होतं. मात्र त्यातून त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने आपली तुलना हार्दिक पांड्याशी केली आहे.हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दीपक चाहर आहे. दुखापतीमुळे ऑगस्ट 2022 पासून संघात नव्हता. आता पूर्णपणे फिट झाला असून कमबॅकसाठी सज्ज आहे. तसेच वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये खेळण्याची इच्छा देखील आहे.
“टीम इंडियामध्ये परत येणं खरंच खूप कठीण आहे.खेळाडूंच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. पण मी लहानपणापासून यापेक्षा वेगळा आहे. मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मला गेल्यावर्षी संधी मिळाली आणि फलंदाजीतून करून दाखवलं. जर मला खेळण्याची संधी मिळाली तर मी संघाला विजय मिळवून देईल.मी माझं सर्वोत्तम देईल. हार्दिक पांड्याकडे बघा. तो तिन्ही प्रकारात फिट बसतो. चांगली बॉलिंग टाकतो, स्विंग आहे आणि फलंदाजीही करतो. त्याची जागा एक दोन वर्षतरी कोणी घेणार नाही. तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे असं खेळणं माझ्यासाठीच नाही तर इतर कोणत्याही खेळाडूसाठी टिममध्ये जागा मिळवण्याची निश्चिती देते.”, असं दीपक चाहरनं स्पोर्टतकशी बोलताना सांगितलं.
दीपक चाहर टी 20 वर्ल्डकपपूर्वी जखमी झाल्याने संघाबाहेर आहे. यंदा भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली फलंदाजी करणं आवश्यक आहे. दीपक चाहर आतापर्यंत 13 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 16 गडी बाद केले आहेत. फलंदाजीत 203 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये 9 वेळा बॅटिंग करण्याची संधी मिळाली. टी20 फॉर्मेटमध्ये 24 सामने खेळला असून 29 विकेट्स घेतले आहेत. तसेच एकूण 53 धाावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याला 6 वेळा फलंदाजीची संधी मिळाली होती.