कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कॅनबेरा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पुन्हा एकदा पाच वर्षांपूर्वीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या, ज्या घटनेत फिल ह्यूज या खेळाडूचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने जागेवरच कोसळला. करुणारत्नेच्या मानेवर जोरात हा चेंडू लागला.
https://twitter.com/183_264/status/1091580599754784768
करुणारत्ने कोसळताच मैदानावर एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. करुणारत्ने कोसळताच तातडीने मेडिकल टीमला बोलावण्यात आलं. त्यानंतर स्ट्रेचर आणून त्याला रुग्णालयात नेलं. करुणारत्नेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कमिन्सने 142 प्रति घंटा वेगाने चेंडू फेकला होता. हा वेगवान चेंडू थेट करुणारत्नेच्या मानेवर लागला.
https://twitter.com/183_264/status/1091582764242141184
करुणारत्नेने हेल्मेट घातलेलं होतं. पण हेल्मेट आणि मान यांच्या मध्ये हा चेंडू लागल्याने तो जागेवरच कोसळला. करुणारत्ने कोसळला त्यावेळी त्याने 85 चेंडूंमध्ये 46 धावा कल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने तीन शतकांच्या बळावर पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाने चार बाद 384 धावांहून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि पाच बाद 534 धावांवर डाव घोषित केला.
https://twitter.com/183_264/status/1091583780962357248
दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने तीन बाद 123 धावा केल्या. कुशल परेरा 11 आणि धनंजय डि सिल्वा एक धावावर खेळत आहेत. करुणारत्ने आणि लाहिरु थिरिमाने यांनी 82 धावांची भागीदारी करुन श्रीलंकेचा डाव सांभाळला. पण मानेवर चेंडू लागल्याने पुढे करुणारत्नेला खेळता आलं नाही.
पुन्हा ‘त्या’ घटनेची आठवण
करुणारत्नेच्या घटनेने फिल ह्यूजच्या मृत्यूची आठवण करुन दिली. 27 नोव्हेंबर 2014 रोजी फिल ह्यूजच्या मृत्यूने अवघं क्रिकेटविश्व हळहळलं होतं. सिडनीतील एका डोमेस्टिक सामन्यात खेळताना त्याला चेंडू लागला आणि 26 व्या जन्मदिनाच्या तीन दिवस अगोदरच त्याने जगाचा निरोप घेतला. 25 नोव्हेंबर 2014 च्या सामन्यात न्यू साऊथ वेल्सचा गोलंदाज सीन अबॉटच्या बाऊन्सरवर ह्यूज दुखापतग्रस्त झाला. चेंडू थेट ह्यूजच्या हेल्मेटच्या खालच्या भागात लागला होता. जखमी झालेल्या ह्यूजला स्ट्रेचरवर टाकून दवाखान्यात नेलं. त्याची सर्जरीही करण्यात आली. पण त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.