मँचेस्टर : वर्ल्डकप 2019 मध्ये इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने झंझावाती खेळी करत, विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॉर्गनने एक दोन नव्हे तर तब्बल 17 षटकार आणि 4 चौकारांसह अवघ्या 71 चेंडूत तब्बल 141 धावा ठोकल्या. याशिवाय जॉनी बेअस्ट्रोच्या 90 धावांमुळे इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्ताविरुद्ध 6 बाद 397 धावांचा डोंगर उभा केला. एकाच इनिंगमध्ये एकट्या खेळाडूने 17 षटकार ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. इयान मॉर्गनने अफगाणिस्ताविरुद्ध हा जगावेगळा विक्रम केला.
मॉर्गनने अवघ्या 36 चेंडूत 50 तर 57 चेंडूत शतक झळकावलं. 11 षटकार आणि 3 चौकारांसह त्याने केवळ 57 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आपली तुफानी खेळी कायम ठेवत 71 चेंडूत 141 धावा केल्या.
RECORD-BREAKER!
Eoin Morgan hits his 17th six of the innings – the most ever hit in an ODI!#CWC19 | #ENGvAFG pic.twitter.com/wFfjeBWOdv
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 18, 2019
या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर विन्स आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी झोकात सुरुवात केली. बेअस्ट्रोने 99 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारासह तब्बल 90 धावा ठोकल्या. यानंतर आलेल्या ज्यो रुटनेही तुफाने खेळी केली. त्यानेही 82 चेंडूत 88 धावा कुटल्या.
मग फोडाफोडीची सूत्रं कर्णधार मॉर्गनने हाती घेतली. मॉर्गनने बेअस्ट्रो आणि आणि रुट पेक्षाही झंझावाती खेळी केली. त्याने वन डे क्रिकेटमधील षटकारांचा नवा विक्रम आपल्या नावे केला. एकाच डावात मॉर्गनने तब्बल 17 षटकार ठोकले.
महत्त्वाचं म्हणजे आयपीएलमध्ये आपल्या फिरकीवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या राशीद खानचीही चांगलीच धुलाई झाली. राशीद खानने 9 षटकं ठोकली मात्र यामध्ये त्याला 110 धावा कुटल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.
रोहित शर्माचे 16 सिक्सर
यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने 16 षटकार ठोकले होते. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने 16 षटकार ठोकत 209 धावा केल्या होत्या. याशिवाय आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सनेही विंडीजविरुद्ध 16 षटकार ठोकत 149 धावा केल्या होत्या.