मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारतानं 2-1 ने जिंकली. चौथा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारताने ही मालिका आपल्या खिशात घातली. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता 86 दिवसांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. भारताचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला किमान 2-1 पराभूत करणं गरजेचं होतं. तसंच झाल्याने कर्णधार रोहित शर्मा चांगलाच खूश आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे.
“शब्दात सांगू शकत नाही पण जबरदस्त कसोटी मालिका होती. खूप खेळाडू पहिल्यांदाच ही मालिका खेळले. त्यामुळे आम्हाला मालिकेचं महत्त्व आणि त्या संघाला ओळखणं सोपं झालं. आम्ही खरंच खूप मेहनत घेतली. “, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
Moment to savour ??
This is #TeamIndia ??#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/j6ZR8R8fZr
— BCCI (@BCCI) March 13, 2023
“मालिका सुरु झाल्यापासून प्रत्येक सामन्याचं महत्त्व होतं. दिल्ली टेस्टबद्दल सांगायचं तर मला अभिमान आहे. आम्ही खरंच त्या कसोटीत मागे होतो. इंदुरमध्ये आम्ही प्रेशरमध्ये होतो. वेगवेगळ्या प्लेयर्संनी त्यांचं योगदान दिलं. त्यांनी जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडली आणि यश मिळालं.”, असंही रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.
“टेस्ट क्रिकेट खेळणं खरंच कठीण आहे. वाटतं तितकं सोपं नाही. टीमचा खेळ पाहून मी समाधानी आहे. मी स्वत:साठी काय बेंचमार्क सेट केला आहे, याची जाणीव आहे. मालिकेत आम्हाला अपेक्षित यश मिळालं.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या. या प्रत्युत्तरात आलेल्या टीम इंडियाने सर्वबाद 571 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात 2 गडी बाद 175 धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना अनिर्णित ठरला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.