न्यूयॉर्क : भारताचा उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागलने ग्रँडस्लॅमच्या पदार्पणातच टेनिस स्टार रॉजर फेडररच्या नाकी नऊ आणले. यूएस ओपनमध्ये पहिला सेट जिंकत सुमितने फेडररला घामटं फोडलं. मात्र फेडररने पुढच्या तीन सेट्समध्ये सुमितला कडवी झुंज देत सामना खिशात घातला.
स्वित्झर्लंडचा 38 वर्षीय टेनिसपटू रॉजर फेडररला हैराण करुन सोडणारा हा भारताच्या पठ्ठ्या आहे अवघ्या 22 वर्षांचा. सुमित नागलने यूएस ओपनमधून ग्रँडस्लॅमच्या विश्वात पाऊल ठेवलं. सोमवारी रात्री रंगलेल्या या सामन्यात पहिला सेट जिंकत सुमितने फेडररच्या वर्चस्वाला धक्का दिला.
आर्थर अॅश स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फेडररने पुढच्या सेटमध्ये मात्र दिमाखात पुनरागमन केलं. 6-4, 1-6, 2-6, 4-6 अशा सेट्समध्ये फेडररने सुमित नागलचा पराभव केला. मात्र फेडररला दिलेली झुंज दखलपात्र ठरली आहे.
फेडररविरोधात एखादा सेट जिंकणारा सुमित हा पहिलाच भारतीय ठरला आहे. 2003 पासून यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररने पहिल्यांदाच प्राथमिक फेरीत एखादा सेट गमावला. यापूर्वी रोहन बोपण्णा, सोमदेव देववर्मन यांनी फेडररला हरवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सुमित नागलने सामना गमावला असला, तरी फक्त भारतीयच नव्हे, तर जगभरातील टेनिस चाहत्यांची मनं त्याने जिंकली आहेत.
Sumit Nagal first Indian to take a set off Roger Federer
Federer vs Indians
bt Rohan Bopanna 7-6 6-2 – @Halle 2006
bt Somdev Devvarman 6-3 6-3 – @Dubai 2011
bt Somdev Devvarman 6-2 6-1 6-1 #FrenchOpen 2013 (R2)
bt Sumit Nagal 4-6 6-1 6-2 6-4 #USOpen 2019#USOpen2019— Mohandas Menon (@mohanstatsman) August 27, 2019
सुमित नागल जागतिक क्रमवारीत 190 व्या स्थानावर आहे. सुमितने 2015 मध्ये विम्बल्डन युवा दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. ज्युनिअर ग्रँड स्लॅम जिंकणारा तो सहावा भारतीय ठरला होता.
सुमित नागल हा मूळ पश्चिम दिल्लीतील नांगरोईचा आहे. टेनिसमधील प्रशिक्षणासाठी सुरुवातीला बंगळुरु आणि नंतर कॅनडामध्ये त्याने मुक्काम केला.
जगज्जेता रॉजर फेडरर
रॉजर फेडररच्या नावे विक्रमी 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. विम्बल्डन ओपनमधील आठ, ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहा, यूएस ओपनमधील पाच आणि फ्रेंच ओपनमधील एक अशी 20 ग्रँडस्लॅम जेतेपदं फेडररच्या नावे आहेत.
2004 पासून 2008 पर्यंत सलग पाच वर्ष त्याने यूएस ओपनवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत फेडररला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.
2003 पासून 2009 पर्यंत सलग सात वर्ष फेडररने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यानंतर 2012, 2014, 2015, 2017 आणि आता 2019 अशी जवळपास एकआड एक वर्ष तो विम्बल्डनची अंतिम फेरी गाठत आला. त्यापैकी आठ वेळा त्याने विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. मात्र यंदाही जोकोविचकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला.
ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत तो 31 वेळा पोहचला आहे, तर कारकीर्दीत त्याने तब्बल 156 वेळा अंतिम फेरीत लढत दिली आहे.