फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव, कोण होता फिरोजशाह?

| Updated on: Aug 28, 2019 | 11:20 AM

अरुण जेटली यांनी डीडीसीएला दिलेल्या योगदानामुळे दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव, कोण होता फिरोजशाह?
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील सुप्रसिद्ध फिरोजशाह कोटला स्टेडियमला (Ferozeshah Kotla stadium) आता दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं नाव देण्यात येणार आहे. डीडीसीएने (DDCA) नुकतीच यासंदर्भात घोषणा केली. अरुण जेटली यांनी डीडीसीएला दिलेल्या योगदानामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यकारिणीच्या सभेत एकमताने हा निर्णय घेतल्याची माहिती डीडीसीए (दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन) चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिली. 12 सप्टेंबर रोजी जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री किरण रिजीजू आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. याचवेळी, आधी जाहीर केल्याप्रमाणे मैदानावरील एका स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचं नाव दिलं जाणार आहे.

 


अर्थ, संरक्षण यासारखे महत्वाचे विभाग सांभाळतानाच त्यांनी डीडीसीएचं अध्यक्षपदही दीर्घ काळ सांभाळलं होते. 1999 ते 2013 या कालावधीत ते डीडीसीएच्या अध्यक्षपदी होते. त्याचप्रमाणे बीसीसीआय, आयसीसी गव्हर्निंग कॉन्सिलचेही ते सदस्य होते.

अरुण जेटली यांना क्रिकेटची विशेष आवड होती. अरुण जेटली यांनी फिरोजशाह कोटला स्टेडीयमवर आधुनिक सुविधा देण्यासोबतच प्रेक्षक क्षमता वाढवणे, जागतिक दर्जाची ड्रेसिंग रुम तयार करणे यालाही प्राधान्य दिलं होतं.

अरुण जेटली अध्यक्षपदी असताना दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. यामध्ये गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, इशांत शर्मा, आशिष नेहरा, शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत यासारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

दरम्यान, फिरोजशाह कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचं नाव दिलं जात असलं, तरी मैदानाचे नाव बदललं जाणार नाही. ते फिरोजशाह कोटला मैदान असंच राहणार आहे.

कुठे आहे फिरोजशाह कोटला मैदान?

राजधानी दिल्लीतील बहादूर शहा जफर मार्गावर फिरोजशाह कोटला मैदान उभारण्यात आलं आहे. 1883 मध्ये या स्टेडियमची उभारणी झाली होती. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुनं आंतरराष्ट्रीय मैदान आहे.

2016 पर्यंत टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने 28 वर्ष, तर वनडेमध्ये सतत दहा वर्ष फिरोजशाह कोटला मैदानात अजिंक्य राहिली होती. सुनील गावस्करने याच मैदानात 29 वं कसोटी शतक ठोकून डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अनिल कुंबळेने एकाच डावात दहा बळी घेण्याचा विक्रमही इथेच केला होता.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांचा सुनील गावस्करचा विक्रम मोडण्यासाठी सचिन तेंडुलकरने फिरोजशाह कोटला मैदानातच 35 वं शतक लगावलं होतं.

कोण होता फिरोजशाह कोटला?

फिरोज शाह हा दिल्लीत तुघलक शासनकर्ता होता. त्याचा जन्म 1309 मध्ये झाला होता. वयाच्या 45 व्या वर्षी तो दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला. त्याने आपल्या शासन काळात चांदीची नाणी चलनात आणली होती.

आधीच्या शासकांनी घेतलेले सर्व निर्णय फिरोजशाहने मागे घेतले होते. पुत्र फतेहखानच्या वाढदिवशी त्याने फतेहाबाद शहराची स्थापना केली होती. त्याच्या शासनकाळात दासींची संख्या एक लाख 80 हजार असल्याचं म्हटलं जातं. त्याच्या काळात दिल्लीत अनेक मशिदी बांधण्यात आल्या.